दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध – सुभाष देशमुख

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची हमी

सोलापूर – दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र फळबाग जतन करण्यासाठी प्रामुख्याने ठिंबक सिंचनचा वापर करा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

शनिवारी, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हिरज, डोणगाव, कंदलगाव, येळेगाव, मंद्रूप, शिरवळ, बंकलगी येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

दौऱ्यादरम्यान केळी, लिंबू, कडीपत्ताच्या बागांची सद्य परिस्थिती पाहून त्यावर उपाययोजनात्मक चर्चा त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यासाठीच दुष्काळ दौऱ्याच्या सूचना केल्या आहेत. असे सांगून शेतकऱ्यांना धीर देऊन सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. यावेळी देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पिण्याच्या पाण्यासाठी वाडी वस्तीवर बोअर, टॅंकर आणि चारा छावणीची मागणी प्रामुख्याने दिसून आली. पाणंद योजनेतून रस्ते व्हावेत, लाईट बिल माफ व्हावे अशी मागणी शेतकरी वर्गानी सुभाष देशमुख यांच्याकडे मांडली. बी-बियाणे निम्म्या किंमतीत मिळावे, दुष्काळ निधी, पिक विमा लवकर मिळावा, वडापुर बॅरेज बंधारा लवकर बांधून मिळाल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल, रोजगार हमीची कामे चालू करावीत, कांदा अनुदान/ पीकविमा अद्याप जमा झाले नसल्याची तक्रार काही गावातून झाली. मंद्रूप ग्रामस्थांनी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाण्याची वानवा आहे. पाणी टॅंकर चालू करावेत अशी मागणी केली. दुष्काळ निवारण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येईल अशी हमी सुभाष देशमुख यांनी यावेळी शेतकरी बांधवांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.