“सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेताय”; राहुल गांधींची सरकारवर सडकून टीका

नवी दिल्ली : देशात करोनाने चांगलाच हाहाकार उडाला आहे. त्यातच आता प्रत्येक राज्यात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत असल्याचे दिसत आहे. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भारत सरकारला सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून सरकारला लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, भारत सरकारला हे लक्षात येत नाहीये की, या वेळी करोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.

राहुल गांधी यांनी आत्तापर्यंत लॉकडाउनचा विरोधच केला आहे. गेल्या वर्षी जेव्हा सरकारने लॉकडाउन लागू केला होता त्यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. राहुल यांनी या आधी बऱ्याचदा सांगितलं होतं की लॉकडाउनमुळे फक्त करोना प्रसाराचा वेग कमी होतो, त्यामुळे करोनाचा नायनाट होणार नाही. मात्र, आता राहुल यांनी स्वतःहून लॉकडाउन करण्याचा सल्ला दिला आहे.

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून देशात दररोज तीन लाखांच्या वर करोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक राज्यांमध्ये विकेंड लॉकडाउन, रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.