नवी दिल्ली: जगासह देशात गोंधळ उडवलेल्या पेगॅसस प्रकरणावरून काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी सरकारला घेरण्यासाठी प्लॅन तयार केला असल्याचे दिसत आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात पेगॅसस प्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधीही उपस्थित आहेत.
इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने तयार केलेले पेगॅसस हे स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या डेटाबेसमधून उघडकीस आलेल्या माहितीत ५० हजार मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. त्यातील ३०० मोबाइल क्रमांक भारतीय आहेत. हे मोबाइल क्रमांक वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते यांचे असल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
Delhi: Leaders of Opposition parties hold a meeting at Parliament to chalk out the future course of action on several issues in both the Houses
Congress leader Rahul Gandhi is also present at the meeting. pic.twitter.com/LWYyzioktw
— ANI (@ANI) July 28, 2021
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मोबाईलच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचे प्रकरण समोर आल्याने भारतातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. हा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यासाठी विरोधकांकडून रणनीती ठरवली जात आहे.
यासंदर्भात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेसुद्धा या बैठकीला हजर आहेत. दरम्यान, पेगॅसस प्रकरणावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आहे.