नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या जी. बी. पंत रुग्णालयातील परिचारीकांना रूग्णालयात मल्याळम मधून बोलण्यास मनाई करणारा आदेश रुग्णालयाच्या काही अधिकाऱ्यांनी काढला होता. त्यावरून मोठाच वाद झाल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला आहे.
दिल्लीच्या वैद्यकीय सेवेचे संचालक डॉ. अनिल आगरवाल यांनी सांगितले की, या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश दिला गेला आहे. प्रथम या साऱ्या प्रकाराची चौकशी केली जाईल असे ते म्हणाले. रुग्णालयातील नर्सिंग सुपरिटेंडेंटनी नर्सना मल्याळम भाषेतून न बोलण्याचा हा आदेश जारी केला होता.
या परिचारीका मल्याळम मधून आपसात काय बोलतात हे समजत नसे आणि त्यांनी रूग्णांच्या सेवेत असतानाही मल्याळमचा वापर केल्याने रुग्णांनाही त्या काय बोलतात हे समजत नसे. त्यामुळे नाहक गोंधळ वाढत असल्याने परिचारीकांना मल्याळम भाषेत बोलू नये अशी सूचना केली होती.
परिचारिकांनी केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेचाच वापर करावा अन्यथा त्यांच्यावर कारवाईचाही इशारा देण्यात आला होता. या आदेशावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे शेवटी हा आदेश मागे घेण्यात आला.