लातुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अदानी आणि अंबानी हे दोन मित्र आहेत. देशातील ५ टक्के लोकांकडे ६५ टक्के संपत्ती आहे. यावरून बघून घ्या की त्यांचे मित्र कोण आहेत. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला गरीब जनतेशी काही देणे-घेणे नाही. सत्ताधाऱ्यांना फक्त जुमलेबाज हवे आहेत. मोदी-शहा हे जुमलेबाजांचे सरदार आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली.
लातूर आणि अक्कलकोट येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खर्गे यांची बुधवारी जाहीर झाली. या सभेत त्यांनी कलम ३७०बाबत अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. तसेच राज्यातील महायुती सरकारवरही निशाणा साधला. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राज्यातील दोन पक्ष फोडून भाजपने राज्यात आपले सरकार स्थापन केले. जनतेला खोटी आश्वासने देवून फसवणूक केली. नरेंद्र मोदी यांनी कृषी मालावर जीएसटी आकारून शेतकऱ्यांची लूट करत आहे, असा हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत असून हे आकडे अधिकृत आहेत. महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबिनला योग्य भाव मिळत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला ६० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देणार असल्याचे सांगितले. परंतु, ते दिले नाही. भाजप सरकार दिलेली आश्वासने कधीही पाळत नाही. भाजपच्या खोटारडया आणि फसव्या सरकारला सत्तेतून बाहेर खेचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नेहरुंच्या काळात अनेक मोठे प्रकल्प देशात सुरु झाले आहेत. हरित क्रांती केल्यानंतर काँग्रेस पार्टीमुळे सर्वांना अन्न मिळाले आहे. पण, भाजपचा देशाच्या विकासाशी काहीही संबंध नाही. कर्नाटकात कॉंग्रेसने महालक्ष्मी योजना सुरु झाली आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 3000 रुपये दिले जाणार आहेत. तसेच बेरोजगार तरुणांना 4000 हजार रुपये महिना देणार असल्याचे खर्गे म्हणाले.