सीओईपीच्या क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन
पुणे – सध्या नवनवीन खेळांना प्रोत्साहन मिळत आहे. नागरिकांमध्ये देखील जागृती होत आहे. आपला देश खेळामध्ये देखील पुढे येत आहे. केंद्र सरकारदेखील यासाठी प्रयत्नशील आहे. “खेलो इंडिया’सारख्या विविध पुढाकारांमुळे नवीन पिढीत खेळाडू घडत आहेत. ही चांगली बाब आहे. मात्र, अनेकदा सरकारकडून मिळणारा निधी खेळाडूंपर्यंत पोहोचत नाही, अशी खंत भारतीय कुस्तीपटू गीता फोगाटने व्यक्त केली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे अर्थात सीओईपीच्या “झेस्ट -20′ या क्रीडा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. या कार्यक्रमापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ती बोलत होती. हा महोत्सव 18 वर्षांपासून होत आहे. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक दै. “प्रभात’ आहे. या उद्घाटनप्रसंगी सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, अधिष्ठाता डॉ. पी. आर. धामणगावकर, जिमखान्याचे उपाध्यक्ष एस. एस. भावीकट्टी, महोत्सवाचे समन्वयक प्रा. जी. व्ही. परिषवाड, ए. बी. ढेरे, शारीरिक शिक्षण संचालक अमृता देशपांडे, जिमखाना सचिव मानसी चव्हाण, महोत्सवाचे सचिव कल्याणी पाटील आदी उपस्थित होते. हा महोत्सव दि. 26 तारखेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कुस्ती या खेळात दोन ते तीन पदकांची आशा आहे. स्पर्धांसाठी सरावासाठी वेळ कमी आहे. मात्र, स्पर्धकांच्या कामगिरीमुळे विश्वास आणि आशा नक्कीच वाढत आहे, असा विश्वास देखील तिने यावेळी व्यक्त केला.
स्पर्धांमध्ये वाढ झाल्यास प्रोत्साहन मिळते. मी कुस्ती खेळण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी केवळ आंतरशालेय स्पर्धा होत्या. खेळांना प्रोत्साहन दिल्यास पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल.
केंद्र सरकारदेखील सकारात्मक पद्धतीने खेळांबाबत कार्यरत आहेत. प्रत्येकाने खेळांबाबत सकारात्मक विचार केल्यास खेळासाठी फायदेशीर ठरणार आहे. शासनाकडून खेळाडूंना निधी मंजूर होतो; परंतु हा निधी थेट खेळाडूंपर्यंत पोहोचत नव्हता. सध्या “ऑनलाइन’ व्यवहारांमुळे निधी बॅंक खात्यात जमा होत आहे. निधी खेळाडूंपर्यंत थेट पोहोचल्यास परिस्थितीमध्ये नक्कीच बदल होण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
कुस्तीचा समावेश करावा
या क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल, टेबल टेनिससह सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मात्र, कुस्तीचा समावेश नाही. पुढच्या वर्षीच्या क्रीडा महोत्सवात कुस्ती क्रीडा प्रकाराचा समावेश करा. त्यात विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा गीता फोगाटने व्यक्त केली. यासह मूलभूत गोष्टी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले.