जुन्नर, – जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून शासकीय अधिकारी, कर्मचार्यांनी समन्वयातून येथून पुढे शासकीय कामकाज करणे गरजेचे आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकांना आपल्या कामांकरिता विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाही याची काळजी घेऊन झिरो पेंडन्सी कामकाज सर्व शासकीय कार्यालयात होणे अपेक्षित आहे. यापुढे शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी शासकीय कामाचे ठेके घेऊ नयेत. शासकीय कर्मचारी हे ठेकेदार अशी चुकीची पद्धत जुन्नर तालुक्यामध्ये बंद करणार असल्याचा इशारा शिवजन्मभूमी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिला.
जुन्नर शासकीय विश्रामगृहात सोमवारी (दि. 2) आयोजित शासकीय अधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सुनील शेळके, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, प्रशांत कडूसकर, विठ्ठल भोईर,गणेश भोसले, किरण अवचर, प्रदीप चव्हाण,अनिता शिंदे, निलेश बुधवंत, मंगल गवळी, गोरक्षनाथ आगळे, संदीप भोळे आदींसह तालुक्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित शासकीय अधिकार्यांनी आपापल्या विभागांचा कामकाजाचा तसेच विकासकामांचा आढावा यावेळी सादर केला.
आमदार शरद सोनवणे यांनी पिंपळगाव जोगा धरणातून शेतकर्यांकरिता तातडीने पाणी सोडण्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून येत्या काही दिवसात हे नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या तसेच येडगाव येथील क्रीडा संकुल इमारत, जुन्नरमधील प्रशासकीय इमारत बांधकाम, माणिकडोह आयटीआय दुरवस्था, तालुक्यातील कालव्यांची दुरुस्ती, शासकीय कार्यालमध्ये सोलर यंत्रणा, बिबट सफारी, जुन्नरमधील भुयारी गटार योजना, माणिकडोह धरणातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा आदी विकासकामाबाबत त्यात्या विभागांच्या शासकीय अधिकार्यांनी गांभीर्याने कामकाज करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीमध्ये सचिन वाळुंज, अविनाश कर्डिले, गणेश नायकोडी, विकास राऊत उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित आमदार शरद सोनवणे यांचा सन्मान यावेळी केला.
पोलिसांना दिल्या या सूचना
जुन्नर तालुक्यामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले असल्याने याकरिता जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने पोलीस मित्र नियुक्त करण्यात येऊन सर्व गावात रात्रगस्त सुरू करण्यात यावी. तसेच वेगाने ये-जा करणार्या पिक-अप गाड्यांमुळे अपघातांचे प्रमाण तालुक्यामध्ये वाढलेले असल्याने तालुक्यातील पिक-अप चालकांची जुन्नरमध्ये बैठक घेऊन पोलिसांनी त्यांना वेग नियंत्रणाबाबत कडक सूचना देऊन यापुढे अपघात घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश आमदार सोनवणे यांनी पोलिसांना दिले.