६,७०० शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

३ कोटी रुपये अजूनही मिळेना : ५६ गावांवर २ कोटींची बोळवण

विशाल वर्पे

केंदूर – परतीच्या पावसाबरोबर अवकाळीने संपूर्ण शिरूर तालुक्‍याला झोडपून काढले. यात तालुक्‍यातील 12 हजार 860 शेतकरी बाधित झाले होते. यात महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करून राज्य शासनाला नुकसानीची आकडेवारी पाठविली. मात्र, 104 गावांपैकी 95 गावांतच महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. त्यात 56 गावांतील शेतकऱ्यांना 2 कोटींची नुकसान भरपाई मिळाली आहे. अजून दोन कोटी 94 लाख रुपयांच्या भरपाईपासून 6 हजार 700 शेतकरी वंचित आहेत. नऊ गावांत अद्याप पंचनामे झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

शिरूर तालुक्‍यात परतीचा आणि अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये कांद्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्याखालोखाल तरकारी पिकांचे देखील मळे मातीमोल झालेले होते. अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतीमाल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाले होते.

वर्षातील सर्वात महत्वाच्या पिकांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतीमाल पिकवण्यासाठी घेतलेले कर्ज आणि पुढे वर्षभर उदारनिर्वाह कसा करायचा, या गर्तेत शेतकरी अडकले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. महसूल आणि कृषि विभागाने तालुक्‍यातील एकशे चार गावांपैकी तब्बल 95 गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले होते.

पंचनामे केलेल्या गावातील तब्बल 12 हजार आठशे साठ शेतकऱ्यांचे तब्बल 6 हजार 127. 44 हेक्‍टर क्षेत्रातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेला शेतीमाल आणि बाधित क्षेत्रासाठी कृषि विभागाने महसूल प्रशासनाकडे तब्बल 4 कोटी 97 लाख 70 हजार 896 रुपयांची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात महसूल प्रशासनाने पंचनामे केलेल्या 95 गावांपैकी 56 गावांतील 6 हजार 114 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 2 कोटी 3 लाख 27 हजार रुपयांची रक्‍कम जमा केली आहे.

त्यामुळे उर्वरित 6 हजार 700 शेतकरी नुकसान भरपाईच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. त्यासाठी लागणारी 2 कोटी 94 लाख रुपयांची तरतूद शासन कधी करणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात रक्‍कम कधी जमा होणार, याकडे उर्वरित गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकार स्थापन झाले, तरी प्रतीक्षाच – 
शिरूर तालुक्‍यात 12 हजारांवर शेतकरी बाधित झाले असताना 6 हजार 114 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र, त्याच्या दुप्पट म्हणजे 6 हजार 700 शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. शासनाकडून मिळणारी तुटपुंजी रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

ही फुकापासरी मिळणारी रक्‍कम शेतीच्या मशागतीला पुरणारी नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. सहा हजार 700 शेतकऱ्यांना अजून 2 कोटी 94 लाख रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अवकाळी सरून आता राज्यातील नाट्यमय घडामोडी पार पडल्या. परंतु अजूनही शेतकऱ्यांना मोबादला मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्‍त होत आहे.

तरकारी पिकांना झळ – 
शिरूर तालुक्‍यात तरकारी पिकांना मोठ्या झळ बसली आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांत नगदी पिक घेणाऱ्या उत्पादकांना बाधित होण्याची वेळ आली आहे. त्याचा परिणाम अर्थार्जनावर झाला आहे. अवकाळीच्या चक्रात 12 हजार 860 शेतकरी बाधित झाले. त्यात 6 हजार 127 हेक्‍टर पिके कुजून गेली आहेत. त्यामुळे तरकारी उत्पादकांना एकरी अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पादन खर्च येतो. उत्पादन घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी केलेला लाखमोलाचा खर्च मातीमोल झाला आहे. त्यामुळे वर्षभराचे अर्थकारण कोलमडून पडले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)