नागपूर – महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला नोकरी व शिक्षणाबाबत आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. या विषयावर सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कोणतीही कसर सोडणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच अशोक चव्हाण हे उत्तम काम करत असून मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंनी केले आरोप त्यांनी फेटाळून लावले.
नागपूरातील करोनाच्या स्थितीबाबत प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिका-यांची बैठक पार पडली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर बोलताना थोरात म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत विनायक मेटे यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मेटे सध्या विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत अनेक बैठका घेतल्या. आम्ही दिल्लीतील मोठे वकील उभे केले. मराठा आरक्षण वैध ठरावं यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर करोनाच्या या काळात राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उत्तम काम करत आहे. या काळात राज्य सरकारकडून सर्वाधिक करोना चाचणी केल्या ेगेल्या असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमामुळे शेतक-यांना अधिक फायदा मिळाला आहे. त्यामुळे सरकार म्हणून संकटाच्या काळातही लोकांच्या हिताचेच निर्णय घेतल्या जात असल्याचेही थोरात यांनी सांगितले.