काश्‍मीरातील 99 टक्के निर्बंध उठवल्याचा सरकारचा दावा

श्रीनगर  – जम्मू काश्‍मीरातील 99 टक्के निर्बंध आत्तापर्यंत हटवण्यात आले आहेत असा दावा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. आज पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारचे प्रवक्ते रोहीत कंन्सल यांनी सांगितले की सध्या जे काही निर्बंध लागू आहेत ते केवळ बाहेरून मदत मिळणाऱ्या दहशतवाद्यांवरील नियंत्रणासाठीच आहेत. विघटनवादी लोक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नयेत याची काळजी घेण्यासाठी हे निर्बंध लागू आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की ज्या राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे त्यांच्या सुटकेबाबतचाही आढावा घेतला जात आहे. 16 ऑगस्ट पासून टप्प्याटपप्याने निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केवळ आठ ते दहा पोलिस स्टेशनची हद्द वगळता बाकी सर्व भागातील हालचालींवरचेही निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

आता जवळपास 99 टक्के भागातील हालचालींवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. आता हे राज्य पर्यटकांसाठीही खुले करण्यात आले असून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचे स्वागतच केले जाईल त्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार दक्ष आहे असेहीं या प्रवक्‍त्याने सांगितले. पर्यटन स्थळांवरील इंटरनेट संपर्क सुरू करण्यात येत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच तेथे केवळ काही निर्बंध राहतील असेही सरकारतर्फे नमूद करण्यात आले आहे.

शेजारील देशांकडून मदत घेणाऱ्या काहीं दहशतवादी संघटनांकडून राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हे गृहीत धरून त्यातून लोकांच्या जीविताची हानी होऊ नये यासाठीच अजूनही काही ठिकाणी निर्बंध लागू आहेत असेही त्यांनी नमूद केले.,

Leave A Reply

Your email address will not be published.