सरकारी बाबू शेतकऱ्यांच्या मुळावर

आधी कोरड्या दुष्काळात शेतकरी संपला, तर आता ओल्या दुष्काळात सडतोय

वासुंदे- महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळात होरपळून गेला होता. मात्र तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर केली नाही, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादन खर्चही उत्पादनातून मिळाला नसल्याने पुरता मोडकळीस आला. हाच शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या अत्यल्प साथीवर शेतकरी उभा राहण्यास सक्षम झाला. मात्र, निसर्गाने पुन्हा अतिवृष्टीचा डाव मांडला आणि या नैसर्गिक संकटात त्याच्यासह शेतीपिके सापडली. दौंड तालुक्‍यातील अनेक गावेही या समस्येत अडकली.

अतिवृष्टी होऊन तब्बल महिना उलटून गेला आहे, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, असे असताना महाराष्ट्रातील नेते राजकारणात गुंतले आणि सरकारी अधिकारी निवडणुच्या कामात व्यस्त आहेत. त्यानंतर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत बळीराजाला मिळाली नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाचे सरकार येते आणि शेतकरी हितासाठी कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्‍टर शेतजमिनीसाठी 8 हजार रुपये आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्‍टर 18 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. मात्र या मदतीमध्ये शेतीची मशागत, पेरणी, खते, बी-बियाणे, औषध आणि मजुरीचा खर्चही निघत नसेल, तर अशी मदत काय उपयोगाची, असा प्रश्‍न दौंड तालुक्‍यातील शेतकरी करीत आहेत.

  • शेतकरी नेतेही गप्प
    सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी तासातासाला आणि दिवसा दिवसाला बदलत आहेत. मात्र, येथे शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान बदलत असताना त्यावर कोणताही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपलं अस्तित्व आणि राजकीय भूमिका माध्यमांसमोर सांगण्यात आणि ते पटवून देण्यात व्यस्त आहे. याबरोबरच शेतकरी नेते देखील शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्‍नही शेतकऱ्यांना पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.