गेमिंगच्या जाहिरातींमध्ये धोक्‍याचा इशारा आवश्‍यक

नवी दिल्ली – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून सर्व खाजगी दूरचित्रवाणी प्रसारकांना ऑनलाइन गेमिंग, काल्पनिक खेळांसंदर्भात जाहिरातींसाठी ऍडव्हर्टायझिंग स्टॅंडर्डस काउन्सिल ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. कायद्याने बंदी घातलेल्या कोणत्याही उपक्रमाला जाहिरातीत प्रोत्साहन दिले जाऊ नये अशी सूचना मंत्रालयाने केली आहे.

ऑनलाइन गेमिंग, काल्पनिक खेळ इत्यादीबाबत वाहिन्यांवरील जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचे आढळून आले असून त्यात ग्राहकांना त्यासंबंधित आर्थिक आणि इतर धोक्‍यांची योग्य माहिती दिली जात नाही.

त्यामुळे अशा प्रत्येक गेमिंग जाहिरातीमध्ये डिस्क्‍लेमर असणे आवश्‍यक आहे. या गेममध्ये आर्थिक जोखीम असते आणि ते व्यसन असू शकते. कृपया जबाबदारीने आणि स्वतःच्या जोखमीवर खेळा. अशा प्रकारचे डिस्क्‍लेमर जाहिरातीच्या किमान 20 टक्के जागेत असायला हवे. असे या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.

गेमिंग जाहिराती 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रत्यक्ष पैसे जिंकण्यासाठी ऑनलाईन गेमिंग खेळण्यात सहभागी आहेत असे दाखवू शकत नाही किंवा असे गेम खेळू शकतील असे सुचवू शकत नाहीत.

ऑनलाइन गेमिंगमध्ये रोजगाराचा पर्याय म्हणून उत्पन्नाची संधी मिळू शकते किंवा असे गेम खेळणारी व्यक्ती इतरांपेक्षा यशस्वी असल्याचे जाहिरातीत दाखवू नये, असेही या मार्गदर्शिकेमध्ये म्हटले आहे. इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन, ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन, फेडरेशन ऑफ इंडियन फॅंटेसी स्पोर्टस, आणि ऑनलाईन रम्मी फेडरेशन यांच्या अधिकारी आणि प्रतिनिधींशी सल्लामसलत केल्यानंतर ही सूचना जारी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.