सणबूर -पाटण तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 61 झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले दोन महिने कसलाही करोनाचा संसर्ग पाटण तालुक्यात नसताना लॉकडाऊनच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यात तालुक्यात करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील शासकीय यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाटण तालुक्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता ना. शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तहसील कार्यालय येथे तातडीची बैठक घेतली. बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
ना. देसाई म्हणाले, बाहेरगावाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे, बाहेर पडू नये. करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गेली दोन महिने पाटण तालुक्यात करोनाचा संसर्ग नव्हता. परंतू, आता तालुक्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
मागील दोन दिवसात पाटण तालुक्यातील नवसरी, जांभेकरवाडी, तामिणे या गावांमध्ये रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता जे लोक बाहेरगावाहून तालुक्यात आले आहेत. अशा ठिकाणी गावभेटी देवून हे लोक घरातच कसे राहतील यावर प्रशासनाने जादा लक्ष द्यावे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होणार असल्याने पुरवठा विभागाने दोन महिन्याचे धान्य वाटपाचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता करावी, अशा सूचना केल्या. तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.