गट्टू बसविण्याचे काम विश्वासात न घेता केले

महर्षीनगर परिसरातील नागरिकांचा आरोप

बिबवेवाडी – महर्षीनगर परिसरात पदपथावर निकृष्ठ दर्जाचे बसविण्यात आलेले काळ्या रंगाचे गट्टू (बोलार्ड) हे या परिसरातील रहिवाशांना विश्‍वासात घेऊन बसविण्यात आलेले नसल्यामुळे ते अडचणीचे ठरत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. महर्षीनगर परिसरातील लालबाग सोसायटीजवळ बसविण्यात आलेले गट्टू तुटले असल्याचे व येथील निकृष्ठ कामाचे वृत्त “प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्तानंतर येथील रहिवाशांनी सुद्धा हे काम अत्यंत चुकीचे झाले असल्याचे प्रतिनिधीला सांगितले. आमची घरे या रस्त्यावरच आहेत. घरासमोरील पदपथावर हे गट्टू बसविण्यात आले आहेत. दोन दिवसातच ते तुटले असून पदपथावर बसविलेले ब्लॉकसुद्धा निघाले आहेत. त्यामुळे रहिवाशांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त केली आहे.

या कामामुळे पदपथसुद्धा खराब झाले असून त्यावरून चालणेसुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे या पदपथासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. हे काम ज्या ठेकेदारांने केले आहे.त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करणे गरजेचे असतानाही तसे झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी भेट दिली असती तर या चुकीच्या कामाबाबत आम्हाला सांगता आले असते.

याबाबत संबंधित ठेकेदाराला सांगितले मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देत वरून आदेश आहेत, तसेच काम करत असल्याचे रहिवाशांनी दै. “प्रभात’च्या प्रतिनिधींला सांगितले. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या कररुपी पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणे कितपत योग्य वाटते. हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे. महर्षीनगर परिसरातील नुकत्याच झालेल्या डांबरीकरणाच्या कामाची तपासणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हे बोलार्ड बसविण्याचे काम नगरसेविका राजश्री शिळीमकर यांच्याच विकास निधीतून झालेले आहे.

– अजय खामकर, कनिष्ठ अभियंता, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

महर्षीनगर परिसरातील पदपथाचे काम म्हणजे येथील नागरिकांची निव्वळ फसवणूक आहे. कोणतीही गरज नसताना निकृष्ट दर्जाचे गट्टू बसवून अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

– अल्ताफ सौदागर, अध्यक्ष, सोशल मीडिया सेल कॉंग्रेस

लालबाग सोसायटीजवळील पदपथावर बसविलेल्या गट्टूचे काम हे चुकीचे झाले आहे. माझ्याकडे सुद्धा नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत क्षेत्रीय कार्यालयात लेखी अर्ज देऊन माहिती घेणार असून सहायक आयुक्त यांना याबाबत चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.

– प्रवीण चोरबेले, नगरसेवक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.