कोपरगावमध्ये एक लाखाची रोकड हस्तगत

कोपरगाव – कोपरगाव-टाकळी फाटा येथे एका दुचाकीवरील तरुणाकडे बेहिशोबी एक लाख सात हजार रूपयांची रक्‍कम भरारी पथकाने हस्तगत केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर घडली. याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहराजवळील टाकळी फाटा येथे भरारी पथकाने वाहन तपासणी करीत असताना, येसगाववरून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या बजाज बॉक्‍सर मोटरसायकल क्रमांक (एम एच 15 एल 7051) वरील तरुण समाधान बाळू सूर्यवंशी (वय 26, रा. धारणगाव रोड, राजगुरू सोसायटी) हा एका फायनान्स कंपनीमध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करीत आहे. याच्याकडील बॅगमध्ये एक लाख सात हजार 590 रुपये आढळून आले. संबधीत रकमेबाबत पथकाने तरूणाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे बॅगेतील सर्व रक्कम ताब्यात घेऊन त्याच्या इतर कागदपत्रांची माहिती घेऊन त्याला सोडून देण्यात आले.

निवडणुकीच्या तोंडावर कोपरगाव मतदारसंघांमध्ये प्रथमच अशी रक्कम पथकाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधीत तरुण हा हैद्राबाद येथील स्पंदन या फायनान्स कंपनीमध्ये काम करत असलेले ओळखपत्र पथकाला आढळून आले आहे. स्पंदन या फायनान्स कंपनीचे आर्थिक व्यवहार कायदेशीर नसल्याने सापडलेल्या रोकड रकमेचे योग्य पुरावे सादर करता आले नाही. भरारी पथकामध्ये मनोज सिन्हा, सुनील तडवी, राजेंद्र गाडे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, मारुती गंभीरे, जे. आर. भांगरे, पी. एन. थोरात, मंडलिक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.