बारामतीकर महायुतीला साथ देतील

पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकरांनी व्यक्‍त केला विश्‍वास

बारामती – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व बालेकिल्ले उद्‌ध्वस्त झाले आहेत. बारामतीतील जनता देखील महायुतीच्या सरकारच्या विकासकामांना साथ देईल, असा विश्‍वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्‍त केला.
बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर टीकास्त्र सोडले. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे, महानंदाचे संचालक दिलीप खैरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, प्रशांत सातव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, अविनाश मोटे, नितीन भामे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादीची नेतेमंडळी विकासकामांच्या मुद्‌द्‌यावर बोलत नाहीत ते सध्या भावनिक मुद्‌द्‌यावर बोलत आहेत. जनता मात्र हुशार आहे. जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. माळेगाव येथे झालेल्या सभेत बारामतीच्या विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधान केले असून जिरायती भागातील दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नदीजोड प्रकल्पांतर्गत नीरा व कऱ्हा नदी जोडण्याचा देखील मानस आहे. बारामती तालुक्‍यातील गावे व वाड्यांवस्त्यांवर मी पोहोचलो आहे. गावगाड्यातील लोकांनी मला स्वीकारले आहे. पवारांचा वटवृक्ष बारामतीत वाढला, पण त्याला पोसण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्राने केले आहे. त्याच जनतेने मला बारामतीच्या निवडणूक रिंगणात उभे केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे उपकार फेडण्याची नामी संधी आता बारामतीकरांना आली आहे, असेही पडळकर म्हणाले.

“त्या ठिकाणी’ सीसीटीव्ही बसवा
निवडणुकीच्या दिवशी बारामतीत वाडीवस्तीवर प्रशासनाने बंदोबस्त ठेवावा, मतदान केंद्रात व केंद्राबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.