मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर यांची अखेर घरवापसी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. पडळकर यांच्याबरोबरच कॉंग्रेसचे आमदार काशीराम पावरा आणि शिरपूर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही कमळ हाती घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपात मेगा भरती होणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. परंतू, प्रत्यक्षात तीन जणांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वंचित आघाडीतून बाहेर पडलेले आणि पूर्वाश्रमीचे भाजपाचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा भाजपात घरवापसी केली. तसेच कॉंग्रेसचे आमदार काशीराम पावरा आणि शिरपूर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केला. दरम्यान, कॉंग्रेसचे धुळ्याचे आमदार अमरिश पटेल हे काही दिवसांत भाजपा प्रवेश करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.