ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच गाव विकासाचे वावडे ? 

ग्रामसभेला सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्य गैरहजर : अध्यक्ष निवड न करताच झाली सभा

गोपाळपूर – गाव विकासाच्यादृष्टीने ग्रामपंचायत महत्त्वाचा भाग आहे. गावामध्ये झालेल्या, होऊ घातलेल्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करत असते. परंतु ज्या पदाधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी गाव विकासाची जबाबदारी टाकली त्यांनाच गाव विकासाचे वावडे आहे की काय? असे चित्र शुक्रवारी गोपाळपूरच्या (ता. नेवासे) ग्रामसभेतून दिसून आले. कोणताही निर्णय न होता गोंधळातच ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आदर्श गाव अशी ओळख असलेल्या गोपाळपूरच्या विकास कामांसह इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभेचे शुक्रवारी (दि.24) आयोजन करण्यात आले होते. मात्र गाव विकासाची जबाबदारी असलेले सरपंच, उपसरपंच यांच्यासह सात सदस्यांनी हजर राहणे आवश्‍यक होते. गावकऱ्यांनी त्यांना जबाबदार पदाधिकारी म्हणून निवडून दिलेले आहे. परंतु या झालेल्या सभेला सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्य गैरहजर राहिले. केवळ दोन सदस्यांवर ग्रामसभा घेण्यात आली.

“सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्ये गाव विकासाच्या कोणत्याच मुद्यावर एक मत असल्याचे दिसत नाही. त्यांना ग्रामसेवकांनी काही विचारले तर ते ग्रामसेवकांनाच शिवीगाळ करतात. यामुळे गावाच्या विकासाबाबत काही पाहतच नाहीत. ग्रामपंचायतीच्या सदस्य बैठकीला फक्‍त दोन-तीन सदस्य उपस्थित राहून निर्णय घेतात. यामुळे गावातील सर्वसामान्य लोकांना ग्रामपंचायतीत नेमके काय चालले काही समजून येत नाही.
-ज्ञानेश्‍वर घुले, ग्रामस्थ, गोपाळपूर

सरपंचांच्या परवानगीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. परंतु सरपंच, उपसरपंच हजर नसल्याने ग्रामसभेला उपस्थितीत असलेल्यांपैकी एखाद्या प्रौढ व्यक्‍ती, अथवा ज्येष्ठ नागरिकाची अध्यक्षस्थानी निवड करणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीही न करताच ग्रामसेवकांनी सभेला सुरुवात केली. सभा सुरू झाल्यानंतरही ग्रामसेवक यांनी सभेपुढील विषयांचे वाचन न करताच सहायक कृषी अधिकारी यांना बोलण्यास सांगितले. यानंतर ग्रामसेवक यांनी प्रधानमंत्री आवास योजना व रोजगार हमी योजना यांच्या व्यतिरिक्‍त कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामस्थांना दिली नाही. गाव विकासाच्या कोणत्याच महत्त्वाचा विषयावर चर्चा झाली नाही.

केवळ अंगणवाडी पाणी पुरवठा स्वच्छता समिती व अंगणवाडी विकास निधी या किरकोळ कारणावरून सरपंचपती यांच्या बोलण्यामुळे सभेत गोंधळ उडाला. या गोंधळात सभा उधळली गेली. यामुळे गाव विकासाची जबाबदारी दिलेल्या पदाधिकाऱ्यांना गाव विकासाचे वावडे की काय? असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)