नवी दिल्ली – गुगल कंपनी इंटरनेट हाताळणाऱ्या लोकांच्या खासगी माहितीवर अतिक्रमण करणार नाही. त्या दृष्टिकोनातून गुगल कंपनीने बराच खर्च करून बऱ्याच उपाययोजना केल्या असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.
आज या विषयावर झालेल्या परिषदेनंतर गुगलचे मुख्य खासगी माहिती संवर्धन अधिकारी केथ इन्राइट यांनी सांगितले की, आम्ही या अगोदरही इंटरनेट हाताळणाऱ्याची माहिती सुरक्षित राहावी या दृष्टिकोनातून बऱ्याच नावीन्यपूर्ण उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षितता वाढलेली आहे. मात्र, हे काम निरंतर चालू ठेवावे लागते. यासाठी गुगलच्या विविध देशातील संशोधन आणि विकास केंद्रांमध्ये या दृष्टिकोनातून काम चालू असते. ग्राहकांची खासगी माहिती ही अतिशय महत्त्वाची आणि पवित्र गोष्ट असते याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही याबाबत कधीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.