नवी दिल्ली – इंटरनेटवरील सर्च इंजिन गुगलवर फार अवलंबून रहाल, तर ते किती आणि कसं महागात पडू शकतं, याची चुणूक आज किमान सहा मिनिटांत जगभरच्या युजर्सना आली असेल. गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन, त्यांची जीमेल सेवा, युट्यूब आणि गुगल पेसह गुगल मॅप्ससारखी उपयोगी ऍप्स आज बंद पडल्यानं अल्पावधील जगभर गोंधळ उडाला. गुगलचे सर्व्हर्स जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झाले आणि या समस्येची सुरुवात झाली.
अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत होत्या.
जीमेल वापरकर्त्यांना सिस्टीम एरर दाखवत होते. तसंच यूट्युबवरही एरर येतो आहे आणि गुगल पे वर लॉग-इन एरर येत होता. “असुविधेबद्दल खेद आहे, आम्ही लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ…’ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गुगलवर येत होता. काही ठिकाणी गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु होते. मात्र, मुख्यत्वेकरुन विंडोज युजर्सना ही अडचण सर्वाधिक जाणवली. लिनक्स अथवा ऍपलद्वारे या सेवा सुरळीत सुरु होत्या, असे समजते. हा फटका नेमका कशामुळे बसला आहे? गुगल, युट्यूब आणि जीमेल का डाऊन झालं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
युट्यूबवर लॉग इन केल्यानंतरही युजर्सनला something went wrong हा मेसेज येतो आहे. जगातल्या काही देशांमध्ये गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु आहे असंही समजतं आहे. मात्र जीमेल आणि युट्यूब यांना बराच वेळ एरर येत होता. दरम्यान युट्यूब डाऊन हा ट्रेंडही ट्विटरवर सुरु झाला आहे. याच प्रमाणे गुगल डाऊन आणि जीमेल डाऊन हे ट्रेंडही सुरु झाले आहेत.
युट्यूब, जीमेल आणि गुगल डाऊन झाल्यानंतर जे ट्रेंड सुरु झाले आहेत त्यामध्ये अनेक युजर्सनी मीम्सही तयार करुन ट्विटरवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी गुगलला करोनाची लागण झाल्याचे मिम्सही फिरवायला सुरुवात केली होती.