नवी दिल्ली : गुगलने आज आपले डूडल बंगाली कवयित्री, कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ कामिनी रॉय यांना समर्पित केले. तत्कालीन बंगालच्या बाकरगंज जिल्ह्यात 12 ऑक्टोबर 1864 रोजी जन्मलेल्या, कामिनी रॉय यांची आज 155 वी जयंती आहे.
इंग्रज सरकारच्या काळात कामिनी रॉय या पदवीधर झालेल्या भारतातील पहिली महिला आहे. महिलांच्या हक्कांसाठी कामिनी रॉल यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च करून एकनिष्ठपणे त्याचसाठी काम केले.एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या रॉयचा भाऊ कोलकाताचा महापौर होता आणि त्याच्या बहिणीने नेपाळ राजघराण्याची डॉक्टर म्हणून काम केले. भारतात इंग्रजांचे राज्य होते त्यावेळी महिलांविषयी अनेक गैरसमजूती होत्या. त्यांच्यावर अनेक रुढी, परंपरांच्या नावाखाली अन्याय होत होता. याच अन्यायाच्या विरोधात कामिनी रॉन यांनी आवाज उठवला होता. तसेच महिलांच्या शिक्षणासाठीदेखील प्रयत्न केले होते.
त्यावेळी भारतीय खंडात स्त्रियांबद्दल समाजात गैरसमज होते. त्या काळात कामिनी रॉय यांनी महिलांच्या हक्क आणि त्यांच्या अभ्यासाची बाजू मांडली. कामिनी रॉय यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती, परंतु तिने पुढे संस्कृतमध्ये शिक्षण घेतले. कोलकाता येथील बेथुन कॉलेजमधून 1886 मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली आणि पुढे त्याच कॉलेजमध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करू लागल्या.
दरम्यान, याच कॉलेजमध्ये अबला बोस नावाच्या विद्यार्थीनीसोबत त्यांची भेट झाली. अबला या महिलांच्या शिक्षणासाठी आणि विधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात काम करत होत्या. त्यांच्या या कामाने प्रेरित होवून कामिनी यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांच्या हक्कांसाठी समर्पित केले होते. अशा महान कामिनी रॉय यांच्या कार्याला गुगलने आजचे डुडल समर्पित केले आहे.