मुंबई- अफगाण क्रिकेटर राशिद खानची पत्नी असं गुगल सर्च केलं तर तुम्हाला अभिनेत्री अनुष्का शर्मा असं उत्तर मिळेल. हो हे खरं आहे. तुम्ही फक्त राशिद खान वाईफ असं गुगल बारमध्ये सर्च करा मग तुम्हाला गुगल अनुष्का शर्माच्या नावासोबत तिचा फोटो देखील दाखवेल.
दरम्यान, अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आहे. त्यामुळे राशिद खानची पत्नी असं सर्च केल्यावर अनुष्काचं नाव का येतं, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
२०१८ मध्ये राशिदनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याला बॉलिवूडमधील आवडत्या अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानं अनुष्का शर्मा आणि प्रीती झिंटा असं उत्तर दिलं.
त्यावेळी अनेक माध्यमांनी राशिदची आवडती अभिनेत्री अनुष्का शर्मा याबद्दलचं वृत्त दिलं. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर मेन्शनही केलं. याच कनेक्शनमुळे गुगलवर राशिद खानची पत्नी सर्च केल्यानंतर अनुष्का शर्माचं नाव दिसतं.