तुम्ही ऑनलाइन पेमेंटसाठी गुगल पे (Google Pay) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने त्याच्या ‘गुगल पे’ पेमेंट सेवेसाठी क्रेडिट कार्डच्या मदतीने युपीआय पेमेंट करण्याची सुविधा जारी केली आहे. म्हणजेच युजर्स क्रेडिट कार्डने युपीआय पेमेंट करू शकतील. सध्या ही सुविधा फक्त डेबिट कार्डपुरती मर्यादित होती.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेत, गुगल पे ने मंगळवारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने याची घोषणा केली आहे. आता युजर्सना क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट करण्याची सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, ही सुविधा सध्या रुपे (RU Pay) क्रेडिट कार्डसाठी जारी करण्यात आली आहे.
नवीन घोषणेसह, वापरकर्ते त्यांचे रूपे क्रेडिट कार्ड गुगल पेशी लिंक करू शकतात, जिथे रूपे क्रेडिट कार्ड स्वीकारले जातात अशा सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांना पेमेंट करता येईल.
* या बँकांसाठी सुविधा सुरू
ही सुविधा आता अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या रुपे क्रेडिट कार्डधारकांसाठी उपलब्ध आहे. कंपनी लवकरच या सुविधेसह इतर बँकांना जोडण्याची तयारी करत आहे.
* गुगल पे मध्ये रुपे क्रेडिट कार्ड कसे लिंक करावे?
आता रुपे क्रेडिट कार्डच्या मदतीने गुगल पे वर युपीआय पेमेंट करणे सोपे होणार आहे. रुपे क्रेडिट कार्डसोबत गुगल पे लिंक करणे डेबिट कार्डशी लिंक करण्याइतकेच सोपे आहे. यासाठी वापरकर्त्यांना गुगल पे अॅप उघडावे लागेल. यानंतर, अॅपच्या सेटिंग्जमध्ये जा आणि येथून पेमेंट पर्याय सेट करा.
आता वापरकर्त्यांना पेमेंट आणि अॅड अकाउंटमधून रुपे क्रेडिट कार्ड पर्याय निवडावा लागेल. येथे वापरकर्त्यांना क्रेडिट कार्डचे शेवटचे सहा अंक, एक्सपायरी डेट आणि पिन क्रमांक टाकावा लागेल. यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल. ओटीपी पडताळणीनंतर, वापरकर्ते रुपे क्रेडिट कार्डने युपीआय पेमेंट करू शकतील.