नवी दिल्ली: जगातील जवळपास दोनशे देशात करोना व्हायरसची लागण झाली आहे. या करोनाचा फटका जगातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे जगाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरसचा फटका आता टेक्नोलॉजी जगातील दोन मोठ्या कंपन्यांना म्हणजेच फेसबुक आणि गुगलला बसला आहे.
एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, फेसबुक आणि गुगलला कोरोना व्हायरसमुळे यावर्षी 44 बिलियन डॉलर म्हणजेच 4400 कोटी डॉलरचे नुकसान होवू शकते. या दोन्ही कंपन्यांना करोना व्हायरसमुळे जाहिराती कमी आल्याने हे नुकसान होवू शकते. ग्लोबल इन्व्हेंस्टमेंट बॅंक आणि आर्थिक सेवा कंपनी कॉवेन अँड कंपनीच्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये गुगलचा निव्वळ नफा 127.5 बिलियन डॉलर राहणार असल्याचा अंदाज होता. परंतु, करोना व्हायरसमुळे यात 28.6 बिलियन डॉलरची कमी येण्याची शक्यता आहे. कॉवेनच्या रिपोर्टनुसार, या वर्षी ट्विटरच्या कमाईत 18 टक्के कमी पाहायला मिळू शकते.
फेसबुकच्या संदर्भात कंपनीने म्हटले की, फेसबुकला यावर्षी जाहिरातीमधून 67.8 बिलियन डॉलर नफा मिळण्याचा अंदाज होता. परंतु, कोरोना व्हायरसमुळे यात 15.7 बिलियन डॉलरची कमी पाहायला मिळू शकते.