पुणे – शालेय शिक्षण विभागाकडून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील 40 हजार शिक्षकांना गुगल क्लासरूमचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी 13 जुलैपर्यंत मुदत आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा. शिक्षक व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासालया देता येणार आहे. विद्यार्थ्यांना मूल्यमापन करता यावे व शिक्षकांच्या अध्यापन, गृहपाठ, सूचनांचा त्याच्या सोयीनुसार लाभ घेता यावा यासाठी गुगल क्लासरूम मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच्या प्रशिक्षणासाठी आधी शासकीय व दुसऱ्या टप्प्यात खासगी अशा दोन्ही पद्धतीच्या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षण हे तीन तासांचे असणार आहे. ज्या तंत्रस्नेही शिक्षकांकडे इंटरनेट सुविधेसह डेस्कटॉप संगणक, लॅटपटॉप अथवा फक्त प्रशिक्षण कालावधी पुरते ज्यांना इंटरनेट सुविधेसह दोन स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकतील अशा शिक्षकांनी https://google.addingdimensions.in/Home.aspx या लिंकवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
‘एसएमएस’द्वारे शिक्षकांना गुगल क्लासरूमचा आयडी व पासवर्ड व प्रशिक्षणाचा तपशील समजणार आहे, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी बजावले आहेत.
प्रत्येक शिक्षक, विद्यार्थ्यांना शाळेसाठी आयडी तयार करून देण्यात येणार आहे. त्याच्या सहाय्याने शिक्षक एकावेळी 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका घेऊ शकतात. तासिका रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. गुगल केवळ गुगल क्लासरूमचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असून शिक्षक व विद्यार्थी यांचा डेटा केवळ शालेय शिक्षण विभागाकडे राहणार आहे.