कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा
पुणे – विविध स्किमच्या नावाखाली आर्थिक गुंतवणुकीवर आकर्षक मोबदला किंवा सोन्याचे दागिने देण्याच्या आमिषाने 3 कोटी 4 लाख 43 हजार 880 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुडवीन ज्वेलर्सचे मालक व इतर पदाधिकारी अशा 6 जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल 89 गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी आशा गणेश गायकवाड (वय 45, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार अकाकरण मोहनन, सुधीरकुमार अकाकरण मोहनन, जस्टीन, अश्वीन, चंद्रिका, श्रीकला नायर अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
बंडगार्डन रस्त्यावर कॅनोट प्लेस येथे गुडविन ज्वेलर्सचे कार्यालय होते. आरोपींनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील भिशी, ठेवी व स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा किंवा सोन्याचे दागिणे मिळतील, असे आमिष दाखवले. प्रलोभनाला बळी पडत तक्रारदार यांनी स्कीमध्ये 3 लाख रुपये 2018 मध्ये गुंतविले होते. अशाच प्रकारे शहरातील इतर 88 गुंतवणूकदारांनीदेखील 3 कोटी 4 लाख 43 हजार रुपये गुंतविले.
परंतु, या गुंतवणूकदारांना परतावा देण्या अगोदरच 23 ऑक्टोबरपासून गुडविन ज्वेलर्स बंद असल्याचे निदर्शनास आले. अनेक दिवस गुंतवणूकदारांनी ज्लेलर्स दुकानाचा पाठपुरावा केला मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी अनेक गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिले.