#GoodNews : आंबेगावात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वेग अधिक

तालुक्‍यात दिवसभरात सहा जणांना लागण तर दोघांचा मृत्यू

मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्‍यात बुधवारी (दि.ल 5) सहा जणांना करोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा वेग अधिक आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्‍यातील करोनाबधितांची संख्या 342 वर पोहोचली आहे. तर 239 जण करोनावर मात करून घरी परतले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत केवळ 96 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी अवसरी खुर्द, गंगापुर खुर्द, पारगाव, पिंपळगाव खडकी, जारकरवाडी, शिनोली या गावांमध्ये प्रत्येकी एक असे सहा जण करोना पॉझिटिव्ह आले आहे. तर खडकीतील एक व शिनोलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्‍तींना होमक्‍वारंटाइन करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी जागरूकता बाळगावी. करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावाचत बाहेर गावाहून येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावातील नागरिक घरात थांबणार असून बाहेर गावाहून गावात कोणीही येऊ नये. गावातील रस्ते आणि परिसराची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून गावात स्वच्छता केली जात आहे.
– डॉ. सुरेश ढेळके, आरोग्य अधिकारी, आंबेगाव तालुका

नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.