आरोप करण्यातच धन्यता; पाण्याच्या प्रश्‍नातही एकनाथ पवारांचे राजकारण

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयाचे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले. नगरसदस्यांनी आपल्या प्रभागातील पाणी प्रश्‍न मांडल्यानंतरही एकनाथ पवारांनी त्यावर राजकीय प्रश्‍न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या नामुष्कीवर राजकारण केले. पाणी प्रश्‍नावर शहरवासियांना दिलासा देण्याऐवजी आपल्या भाषणबाजीत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करत स्वत:चेच हसे करून घेतले. पवारांनी केलेल्या प्रकाराचीच चर्चा नगरसेवकांमध्ये रंगली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आक्‍टोबर महिन्यातील स्थगित आणि नोव्हेंबर महिन्याची मासिक सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. मंगळवारी आयुक्तांनी शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. अपेक्षेप्रमाणे आजच्या सभेत या निर्णयाचे पडसाद उमटले. सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी पाणी प्रश्‍नावर प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांना पाणीप्रश्‍नामुळे होत असलेल्या त्रासाची माहिती सभागृहासमोर मांडली. सर्वच पक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्‍नावर समस्या मांडल्या. सर्वांत शेवटी सभागृहनेते एकनाथ पवार यांचे भाषण झाले.

अनेक नगरसदस्यांनी मांडलेला पाणी प्रश्‍न म्हणजे राजकीय स्टंटबाजी असल्याचे म्हणत ज्या अर्विभावात नगरसेवकांनी भाषणे केली ती केवळ नागरिकांना दाखविण्यासाठी असल्याची टीका केली. विशेष म्हणजे ज्या राष्ट्रवादीने भामा आसखेड, आंध्रा प्रकल्पाला मंजुरी दिली, पवना बंद पाईपलाईनचा प्रकल्प सुरू केला होता, त्याच राष्ट्रवादीवर हे प्रकल्प सुरू न केल्याचे खापर फोडले. गेल्या अडीच वर्षांत पाणी पुरवठ्याचा एकही प्रकल्प भाजपाला यशस्वी करता आला नाही, नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे, नागरिकांना दिलासा देण्याऐवजी कामगार नेत्याच्या थाटात केलेले पवारांचे भाषण चर्चेचा विषय ठरला आहे.

आश्‍चर्याची बाब म्हणजे शहरात पाणी टंचाई असतानाही जे नगरसेवक बोलले ते खोटे असल्याचे सांगत आम्ही बोललो तर महागात पडेल, अशी धमकीही दिली. पवार हे सभागृह नेते असतानाही त्यांनी दाखविलेला बोलघेवडेपणा दुर्देवी असल्याची टीका अनेकांनी सभेनंतर केली. पुढील 25 ते 30 वर्षांचे नियोजन करण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागत असल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांच्या अपयशावरही शिक्कामोर्तब केले. सत्तेच्या जोरावर आपण काहीही करून शकतो, असाच अविर्भाव त्यांनी दाखविल्यामुळे काही सत्ताधारी नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. कामात दिरंगाई, काम न करण्याऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, आयुक्तांनी नियोजन करावे, त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा अधिक ताकदीने कामाला लावा, अशा काही राजकीय सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी यावेळी केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.