कारभारी चांगला, तर विकासकामे सुसाट

शिवाजी आढळराव पाटील : खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

राजगुरुनगर  – कारभारी चांगला असेल, तर विकासकामाला अडथळा येत नाही. विकासकामांना गतीच येते, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राजगुरूनगर येथे केले.

आमदार सुरेश गोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून व खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, अंकुश राक्षे या सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे आचार संहिता लागण्याआधी खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तब्ब्ल पाच कोटी रुपये निधी मिळाला असून त्याचे भूमिपूजन आढळराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, महिला संघटक विजया शिंदे, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, बाबाजी काळे, निर्मला पानसरे, रूपाली कड, दीपाली काळे, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अंकुश राक्षे, अमर कांबळे, अमोल पवार, ज्योती अरगडे, नंदा सुकाळे, वैशाली जाधव, चांगदेव शिवेकर, अरुण चौधरी, सुनीता सांडभोर, मच्छिंद्र गावडे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, सुरेश चव्हाण, गणेश सांडभोर, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शेखर शेटे, मारुती सातकर, नंदा कड, उपअभियंता सुरेश कानडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, खेड शहर उत्तर पुणे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. या शहराला न्याय देण्याचे काम शिवसेना-भाजप ने केले. गेले अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत शहर होते. तो प्रश्‍न या सरकारने सोडवला. शहराची लोकसंख्या वाढली त्यामुळे अनेक अडचणी वाढल्या त्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक रस्त्यांचे जाळे खेड तालुक्‍यात झाले. विकासाची घोडदौड आमदार गोरे यांनी सुरू केली आहे. ती निवडणुकीनंतरही कायम राहील. मला पराभवाचे शल्य नाही. मी लोकांमध्ये लोकांची कामे करण्यासाठी नव्या दमाने फिरत आहे. शिवसेना भाजपची ताकद माझ्या मागे कायम ठेवली आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम यापुढेही सुरू राहील. खेड तालुक्‍याने भरपूर दिले याचे उपकार विसरणार नाही.

आमदार गोरे म्हणाले की, नागरिकांसाठी गरजेच्या असलेल्या खेड पंचायत समितीला नवीन इमारत असणे गरजेचे होते. या इमारतीत तालुक्‍याचा प्रशासकीय कारभार केला जात होता. गेली 60 वर्षे जुनी इमारत होती. 14 विभाग या इमारतीत काम करीत होते. आलेल्या नागरिकांना अपुरी जागा पडत होती. या इमारतीचे नूतनीकरण गरजेचे होते. नवीन इमारत बांधण्याची मागणी पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांनी केली. त्याला निधी मिळाल्याने सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार असल्याने तालुक्‍याचे वैभव वाढणार आहे.

प्रत्येक नागरिकाला या इमारतीत असलेल्या विभागातून सर्व सुविधा आणि समाधान मिळेल. नागरिकांच्या सर्व गरजा आणि पुढील 50 वर्षे या इमारतीतून कामकाज होईल, अशी बांधणी केली जाणार आहे. सर्व नागरिकांवर बारकाईने लक्ष असून त्यांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन कोकणे यांनी, तर गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी आभार मानले.

पंचायत समितीची जुनी व अपुरी इमारत झाल्याने आम्ही नवीन इमारत बांधण्याचे ठरवले, त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्री यांच्याकडे आमदार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. पाच कोटींचा निधी मंजूर झाला. अजूनही सुमारे अडीच कोटींचा उर्वरित निधी मिळावा यासाठी आमदार गोरे यांच्या मदतीने पाठपुरावा केला जाणार आहे.

– भगवान पोखरकर, उपसभापती, खेड तालुका

इमारत जुनी व अपुरी पडत होती. एप्रिल 2017 ला ठराव करून पंचायत समितीने पाठपुरावा केला. आमदार सुरेश गोरे यांच्या माध्यमातून पाच कोटींचा निधी मंजूर झाला. 22 जुलै रोजी तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर सर्व परवानग्या घेतल्या असून काम लवकर सुरू करण्यात येणार आहे, सुरुवातीला पार्किंग व पहिला मजला करणार. तसेच नैसर्गिक वातावरण ठेवून बांधकाम करण्यात येणार आहे.

– सुरेश कानडे, उपअभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती खेड

Leave A Reply

Your email address will not be published.