पुणे – लॉकडाऊनमध्ये घटलेले प्रदूषण प्रमाण कायम ठेवण्यासाठी बावधन येथीलनागरिकांकडून “नो व्हेइकल डे’ राबवण्यात येणार आहे. येथील स्थानिकांनी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी खासगी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रदूषणात देखील भर पडत आहे. लॉकडाऊनमध्ये वाहनांचा वापर कमी असल्याने प्रदुषणाची पातळी 80 टक्क्यांहून अधिक घटली होती. मात्र, अनलॉक प्रक्रियेत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने पुन्हा एकदा प्रदूषणात वाढ झाली. लॉकडाऊनमध्ये सुमारे 4 महिने घटलेले प्रदूषण कायम ठेवण्यासाठी बावधन नागरिक मंचाच्या (बावधन सिटीझन फोरम) वतीने वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी वाहनांचा वापर करण्याऐवजी चालणे, पळणे, सायकलिंग किंवा खासगी वाहनांचा वापर करावा, असे मंचाच्या वतीने आवाहन केले आहे. यासाठी गूगल फॉर्मद्वारे प्रतिज्ञादेखील नोंदवली आहे. डिसेंबरच्या “नो व्हेईकल डे’मध्ये देखील 100 हून अधिक सहभागी होण्याची शक्यता असून, यापूर्वी झालेल्या पहिल्या “नो व्हेइकल डे’मध्ये देखील सुमारे 30 नागरिक सहभागी झाले होते.
बावधन नागरिक मंचाच्या वतीने समस्या सोडवण्यावर भर दिला जातो. लॉकडाऊनमधील घटलेली प्रदूषण पातळी कायम ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बावधन परिसरात हा उपक्रम राबवण्यात येणार असून, शहराच्या विविध भागांत याचे आयोजन करण्यात येणार आहे.
– दुष्यंत भाटिया, बावधन नागरिक मंच