यंदा भाताचे चांगले उत्पादन निघणार

पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला

पुणे – पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्याचा फायदा भातपिकाला होत आहे. भातपट्टा लागवडीच्या ठिकाणी हा पाऊस पोषक ठरत आहे. त्यामुळे भात उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून यंदाच्या खरीप हंगामात भाताचे चांगले पीक हाती लागण्याच्या शक्‍यतेने शेतकरी सुखावला आहे.

गेली दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. तसेच उन्हाचा पारादेखील वाढला आहे. त्यामुळे भात खाचरे कोरडी पडायला सुरुवात झाली होती. परिणामी भातरोपे पिवळी पडल्यास भातपीकाचे अपेक्षित उत्पादन हाती न लागण्याची शक्‍यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गेली दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात हलक्‍या सरींच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भातपिकाला नवसंजीवनी मिळाली आहे.

भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्‍यांमध्ये भाताचे सरासरी 72 हजार 953 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी 57 हजार 817 हेक्‍टर क्षेत्रावर भाताची पुनर्लागवड करण्यात आली आहे. ही आकडेवारी एकूण लागवडीच्या 79 टक्‍के एवढी आहे. याशिवाय अद्यापही 15 हजार 136 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड होणे बाकी आहे. मावळ व मुळशी तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी भात रोवाटिका टाकण्याऐवजी एसआरटी पद्धतीने लागवड केल्याने रोपवाटिकेच्या प्रमणात घट झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.