छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम चित्रपटाला प्रोत्साहन दिले असून सिनेमा हा ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज आपले सिनेमे जगभर जात असून जगभरातील प्रेक्षक त्यांना उत्तम प्रतिसाद देत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी येथे केले.
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रसिक प्रेक्षकांशी संवाद साधला.
यावेळी केंद्रीय सचिव संजय जाजू म्हणाले, आपल्या देशाला एक महान सांस्कृतिक परंपरा असून नाट्य शास्त्रापासून कला, नाट्य, नृत्य आणि संगीत यांचा वारसा लाभलेला आहे. याच शृंखलेतील सिनेमा हे आधुनिक माध्यम आहे. केंद्रीय सचिव म्हणून पदभार स्वीकारून आता मला एक वर्षे झाले आहे. या पदावर आल्यानंतर मला गोव्यानंतर येथे असलेली विविधता आणि चित्रपटाची संस्कृती पुढे नेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येथील लोकांनी एकत्रित येत स्वत: हा महोत्सव सुरू केला, याचे कौतुक वाटते.
पुढे ते म्हणाले, आज मला या महोत्सवात सहभागी होत असताना मनापासून आनंद होत आहे. विशेषत: दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मास्टर क्लास ऐकण्याची संधी मला मिळाली. आज देशाच्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या नावीन्यपूर्ण प्रयोगांना भारत सरकार सहकार्य करत असून आपले वेगळेपण जपणाऱ्या या महोत्सवाला भविष्यात केंद्र सरकारच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन संजय जाजू यांनी दिले.
यावेळी महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक जयप्रद देसाई, दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, संयोजक नीलेश राऊत, प्रा. शिव कदम उपस्थित होते.