नवी दिल्ली -सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला शुक्रवारी स्पुटनिक-व्ही या रशियन बनावटीच्या करोनावरील लसीचे उत्पादन करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. त्याबाबतची सशर्त परवानगी भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) सीरम कंपनीला दिली. त्यामुळे पुण्यात आणखी एका लसनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीरमने गुरूवारी स्पुटनिक-व्हीच्या उत्पादनाची परवानगी मागणारा अर्ज डीसीजीआयकडे सादर केला. त्याला तातडीने मंजुरी मिळाली. आता रशियन संस्थेच्या सहकार्यातून सीरम त्या लसीचे उत्पादन करणार आहे. रशियन संस्था आणि सीरममध्ये झालेल्या कराराची प्रत सादर करण्याची अट डीसीजीआयने घातली आहे.
उत्पादन सुरू करण्याला हिरवा कंदील मिळाल्याने आता सीरमकडून स्पुटनिक-व्हीच्या मर्यादित आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली जाईल. सीरमकडून सध्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन आणि पुरवठा सुरू आहे. भारतात कोविशिल्डचाच वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता रशियन लसीच्या उत्पादनालाही भारतात वेग मिळू शकेल.
स्पुटनिक-व्हीचे उत्पादन भारतात याआधीच सुरू झाले आहे. ते उत्पादन डॉ.रेड्डीज लॅबोरटरीजकडून केले जात आहे.