खुशखबर! पारले जीच्या नफ्यात ‘इतक्या’ कोटींनी वाढ 

नवी दिल्ली – देशावर आर्थिक मंदीचे सावट आणि जीएसटीमुळे नुकसान होत असल्याचे कारण देत पारले जी कंपनीने आपल्या उत्पादनात ८ ते १० टक्क्यांची कपात केली होती. परंतु, आता पारले जी आर्थिक परिस्थितीतून सावरताना दिसत आहे. एका अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०१९ मध्ये पारले जी कंपनीला ४१० कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

काही दिवसापूर्वीच बिस्किट उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या पारलेजी कंपनीने आपल्या उत्पादनात ८ ते १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पारले-जीच्या ढासळत्या विक्रीपायी कंपनीच्या १० हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचे वृत्त होते. कंपनीने १०० किलो प्रती अथवा त्यापेक्षा कमी असलेल्या बिस्किटांवर जीएसटी घटवण्याची मागणीही केली होती. परंतु, आता एका अहवालानुसार पारले जी कंपनीला नफा झाला असल्याचे समोर येत आहे.

व्यवसाय प्लॅटफॉर्म टॉफलरनुसार, गेल्या आर्थिक वर्षापेक्षा पारले समूहाचा नफा १५.२ टक्क्यांनी वाढला आहे. पारले जी बिस्किट्सना २०१९ आर्थिक वर्षात ४१० कोटी रुपयांचा नफा झाला. पारले कंपनीचा मागील वर्षातील नफा ३५५ कोटी होता. म्हणजेच पारलेच्या एकूण महसूल ६.४ टक्क्यांनी वाढ होऊन ९,०३० कोटी रुपये झाला आहे.

दरम्यान, जीएसटी लागू होण्यापूर्वी बिस्किटांवर १०० रुपये प्रतिकिलो किंमत असलेल्या १२ टक्के कर आकारला जात होता. पण सरकारने जीएसटी लागू केल्यावर सर्व बिस्किटे १८ टक्के स्लॅबमध्ये टाकण्यात आली. अशा परिस्थितीत कंपन्यांच्या उत्पादनांची किंमत वाढली. त्यामुळे विक्री कमी होण्यास सुरूवात झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.