मुंबई – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन मार्गदर्शन दि.25 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टीच्या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी ऍप अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे.
पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण 4 अभ्यास घटकांचे दिवसाला 2 तास याप्रमाणे ऑनलाईन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील.
हे प्रशिक्षण वर्ग बार्टीच्या युट्यूब चॅनल वरूनही थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षणामध्ये वाचन साहित्य,मार्गदर्शकांच्या नोट्स याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल. उमेदवारांच्या शंकांचे निरसन ई-मेलद्वारे करण्यात येईल.
बार्टी संस्थेद्वारे आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी, समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येईल, असेही बार्टीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.