वादळाचा फटका बसलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी

पुणे – राज्यातील 34 जिल्ह्यांतील 349 तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयच्या अखत्यारित असलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

“क्यार’ व “महा’ या चक्रीवादळांमुळे राज्याला मोठा तडाखा बसला. या बाधित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय दि. 18 नोव्हेंबर रोजी शासनाने घेतला होता. मात्र, बऱ्याच तालुक्यांत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या तालुक्यांचा समावेश राज्य शासनाच्या यादीत नव्हता. यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी सुधारित परिपत्रक करीत 34 जिल्ह्यातील 349 तालुक्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली. त्यामुळे तंत्रशिक्षणच्या बहुतांश विद्यार्थ्यांचे शुल्कमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

दरम्यान, 325 ऐवजी 349 तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु 349 तालुक्यांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे नसल्यामुळे 24 तालुक्यांमधील पात्र विद्यार्थी परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीपासून वंचित राहिले होते. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुधारित शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता 349 आपद्ग्रस्त तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

 

शुल्कमाफीची मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेने केली होती. त्याला अखेर यश आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.