गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी; मानधनात होणार बक्कळ वाढ

sarpanch । Girish Mahajan- सरपंचांच्या मानधनात वाढ होणार असून या माध्यमातून सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मंत्री गिरिश महाजन यांच्याकडून सरपंचांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ‘मानधन वाढीचा प्रस्ताव आठवड्यात मान्य करणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
सरपंच करत असलेल्या या आंदोलनाला काल उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी भेट दिली होती. विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन सुरु होते. मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो सरपंच एकवटले होते. सरपंचांच्या मानधन वाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याची माहिती देखील मंत्री महाजन यांन दिली.
ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. ग्रामपंचायतींच्या निधीबाबत सुवर्णमध्य काढला जाईल असंही महाजन यांनी सांगितलं. मानधन अल्प आहे, त्यात वाढ करावी, अशी मागणी सरपंचांनी केली होती. येत्या 8 दिवसांत कॅबिनेट निर्णय होईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.
इतर तांत्रिक मागण्याही मार्गी लावू
ग्रामपंचायतीमधील छोटी कामे असतील, तर 15 लाखांपर्यंत कामे द्यावीत अशी मागणी केली होती. पण कोर्टाचा निर्णय असल्याने 3 लाखांपर्यंत कामे देता येतात. त्यात देखील सुवर्णमध्य काढला जाईल असे महाजन यांनी सांगितले. इतर तांत्रिक मागण्या आहेत, त्या सुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील. प्रमुख दोन्ही मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल असे महाजन यांनी सांगितले.





