माढ्यात राष्ट्रवादीसाठी ‘गुड न्यूज’

सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते सध्या सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या गोटात सामील झाले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदार संघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा ज्येष्ठ नेते बबनराव शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये झळकत आहेत.

मात्र आमदार बबनराव शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चांना त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी छेद दिला असून पक्षांतराच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं त्यांनी म्हंटलय. आपल्या फेसबुक खात्यावर त्यांनी याबाबत एका पोस्टद्वारे माहिती दिली असून काही राजकीय नेतेमंडळी मतदारसंघामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पक्षांतराच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी लगावला आहे.

रणजितसिंह शिंदे यांनी पक्षांतराच्या चर्चांना अफवा ठरविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला माढ्यात गळती लागणार असल्याच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.