करोना लसीकरणाची नगरकरांना खूशखबर..!

39 हजार डोस नगरमध्ये दाखल

नगर (प्रतिनिधी) – करोना लसीकरणासंदर्भात नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आज आनंदाची मोठीच बातमी समोर आली. आज भल्या पहाटेच जिल्ह्यातील लसीकरणासाठी 39 हजार 290 डोस दाखल झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्हा परिषदेच्या शीत साखळी उपकरणांमध्ये ही लस ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फतच जिल्हा शासकीय रुग्णालय, नगर महापालिका व जिल्ह्यातील नगरपालिकांच्या यंत्रणेकडे आरोग्य विभागाने लाभार्थींच्या दिलेल्या यादीनुसार ही लस रवाना होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, डॉ. दादासाहेब साळुंके यांच्या निगराणीखाली या लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लसीचा हा पहिला साठा असून, आज पहाटे जिल्हा परिषदेत तो ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण दोन ते आठ डिग्री तापमानात हे डोस ठेवले जातील, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडूनच हे डोस नगरला आले आहेत.

विशेष म्हणजे भारतातील करोना प्रतिबंधक लसीचा पहिला साठा पुण्यातून मंगळवारी पहाटे रवाना झाला. साधारण 56 लाख डोस त्यातून पाठविण्यात आले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचे एक हजार 88 किलोचे 34 बॉक्‍स दिल्लीला पाठवण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेतील डोस स्टोरेजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, याठिकाणी विनित धुंदाळे, गिरीश धाडगे, किरण शेळके, सुनील सुंबे, इमरान सय्यद या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज (दि. 13 जानेवारी) पहाटे साडेतीन वाजता नगर जिल्ह्यासाठी 39 हजार 290 कोविड-19 लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. राज्य कुटुंब कल्याण केंद्र पुणे या कार्यालयामार्फत हे डोस नगर जिल्ह्याला मिळाले आहेत. ते 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवण्यात आलेले आहेत. राज्यस्तरावरून केंद्रांची संख्या निश्‍चित झाल्यानंतर लाभार्थींच्या संख्येनुसार संबंधित केंद्रावर डोसेसचे वितरण केले जाईल.
डॉ. संदीप सांगळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.