Good News : अखेर नव्या करोनाबाधितांच्या संख्येत घट

नवी दिल्ली – देशात शनिवारी तीन लाख 92 हजार 488 करोना बाधितांची नोंद झाली. शुक्रवारच्या तुलनेत ही संख्या नऊ हजार 500 ने कमी आहे. सोमवार वगळता महिनाभरात प्रथमच करोनाबाधितांची संख्या कमी नोंदवली गेली.

सोमवार वगळता देशांत बाधितांची संख्या सातत्याने वाढत होती. रविवारी चाचण्या कमी होत असल्याने सोमवारी बाधितांची संख्या कमी असे. एप्रिलच्या सुरवातीपासून एक लाख बाधित संख्या होती ती वाढत चार लाख प्रतीदिन एवढी झाली. महिनाभर असणारा हा वाढीचा ट्रेंड अखेर शनिवारी मोडला. बाधितांची संख्या फारशी कमी झाली नसली तरी ही घटही सरलकारला दिलासादायक आहे.

सर्वाधिक बाधित असणाऱ्या महाराष्ट्रातही रुग्णसंख्या घटत असल्याचे दिसत आहे. 22 एप्रिलला सर्वाधिक सात लाख सक्रिय बाधित होते. ती संख्या आता सहा लाख 63 हजारांवर आली आहे. गेले 20 दिवस दररोज 60 हजार बाधित सापडत होते. त्यातही आता घट दिसू लागली आहे.
दिल्लीतही बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेले दोन आठवडे तेथे दररोज सुमारे 20 हजारपेक्षा अधिक बाधित सापडत होते. त्यांत आता घट होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली वगळता अन्य कोणत्यही राज्यात घट होताना दिसत नाही.

महाराष्ट्रात बाधितसंख्या कमी होत असली तरी अन्य राज्यात मात्र बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कर्नाटकात गेल्या दोन दिवसांत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पहायला मिळाली. शुक्रवारी 48 हजार बाधितांची नोंद झाली. तर शनिवारी 41 हजार बाधित नोंदवण्यात आले. उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये बाधितांच्या संख्येने तीस हजारी टप्पा पार केला आहे. बिहार प. बंगाल, राजस्थान ओडिशा आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या वाढताना आढळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.