नवी दिल्ली – झायडस कॅडिला कंपनीने आपल्या कोविड लसीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला असून भारतात या लसीचा डोस 265 रूपयांना देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
सरकारचे या कंपनीशी बोलणे सुरू आहे. या कराराला अजून अंतिम स्वरूप दिले गेलेले नाही. भारत सरकारने 12 वर्षावरील मुलांसाठी ही लस योग्य असल्याचे प्रमाण पत्र दिले आहे. झायडस कॅडिलाची ही झायकोव्ह – डी ही लस देण्यासाठी जेट ऍपलिकेटरची गरज आहे. त्याची किंमत 93 रूपये आहे. ती जमेस धरली तर या लसच्या डोसची किंमत 358 रूपये इतकी भरते.
झायडस कॅडिला ही अहमदाबाद येथील औषध कंपनी आहे.
त्या कंपनीने तीन डोसच्या मालिकेसाठी प्रत्येकी 1900 रूपये अशी किंमत आधी सांगितली होती. त्यांनी ही किंमत आता प्रति डोस 358 रूपये इतकी खाली आणली आहे. ही लस खरेदी करण्याच्या संबंधातील अंतिम निर्णय येत्या आठवडाभरात घेतला जाईल असे सरकारी सूत्रांनी पीटीआयला सांगितले. या लसींचे तीन डोस द्यावे लागतात आणि त्यासाठी प्रत्येक डोस नंतर 28 दिवसांची गॅप घ्यावी लागते.
ही जगातील पहिली डीएनए आधारीत सुई रहित लस आहे. त्याच्या वापराला भारताने ऑगस्ट 2020 मध्येच अनुमती दिली आहे. प्रौढांबरोबरच बालकांनाही ही लस देता येऊ शकते. नोव्हेंबर महिन्यात या कंपनीकडून दोन कोटी डोस उपलब्ध होऊ शकतात.
सरकार सध्या कोविशिल्ड चा डोस 205 रूपयांना, आणि कोव्हॅक्सिनचा डोस 215 रूपयांना खरेदी करते. या लसींचे दोनच डोस द्यावे लागतात. सध्या 18 वर्षावरील नागरीकांना या लसींचे डोस दिले जात आहेत.