गुड न्यूज : सर्वाधिक टेस्टनंतरही आज मुंबईत वाढले केवळ ७०० कोरोनाग्रस्त

आदित्य ठाकरेंची ट्विटरद्वारे माहिती

मुंबई – देशातील कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट ठरल्याने मुंबईकर गेल्या काही महिन्यांपासून चिंतातुर झालेत. मात्र मुंबईमध्ये आज दिवसभरात केवळ ७०० कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासाचं ठरलाय.

याबाबतची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली असून ते म्हणतात, “मुंबईमध्ये आतापर्यंतच्या दिवसभरातील सर्वाधिक ८,७७६ कोरोना चाचण्या केल्यानंतरही केवळ ७०० कोरोना रुग्ण वाढले आहेत. हे चेस द व्हायरस (विषाणूचा पाठलाग) मोहिमेचे यश असून गेल्या तीन महिन्यातील सर्वात मोठा दिलासा ठरला आहे.”

“चेस द व्हायरस मोहीम यापुढेही पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतर्फे शहरात टेस्टिंगचे वाढवण्यात येईल. मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे जिथे नागरिकांना इच्छेनुसार कोरोना चाचणी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे.” असंही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण घटले असून मुंबईतील कोरोनाचा कर्व्ह फ्लॅट होत असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. असं असलं तरी जगभरामध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा वाढल्याची अनेक उदाहरणे समोर असल्याने कोरोनाबाबतची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.