बांधकाम व्यवसायाला साताऱ्यात अच्छे दिन

प्रभात संवाद – मुकुंद फडके

सयाजी चव्हाण : सरकारी धोरण आणखी शिथील होण्याची गरज

सातारा – बांधकाम व्यवसायाला आता साताऱ्यात अच्छे दिन आले असून गेल्या काही महिन्यांपासून परिस्थितीत सकारात्मक बदल झाले आहेत.सरकारी धोरण आणि नियम आणखी शिथील झाल्यास या व्यवसायाला आणखी चालना मिळेल असे मत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेचे अध्यक्ष आणि मंगलमूर्ती डेव्हलपर्सचे सयाजी चव्हाण यांनी व्यक्त केले.प्रभात संवाद या उपक्रमात त्यांनी बांधकाम व्यवसायाबाबतची आपली मते मनमोकळेपणाने मांडताना या व्यवसायासमोरील समस्यांचाही उहापोह केला.

सयाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच बांधकाम व्यवसायाशी संबंधित रचना प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले.याबाबत बोलताना ते म्हणाले,या प्रदर्शनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.ग्राहकांसमोर विविध पर्याय असल्याने अनेक बिल्डर्सचे फ्लॅट बुक झाले.30 फ्लॅट तर जागेवरच बुक झाले.लोकांसाठी आता घर ही चैन राहिली नसून गरज झाली असल्याचेच यातून सिध्द होते.सातारच्या बाजारपेठेत व्यापारी गाळ्यांनाही चांगली मागणी आहे.सध्याचे चित्र असे आहे की बांधकाम व्यावसायिकांकडे गाळे शिल्लक नाहीत.लोकांची मागणीही वाढत आहे.

गेली काही वर्षे या व्यवसायाला मंदीचा फटका बसला होता.त्याबाबत विचारले असता सयाजी चव्हाण म्हणाले,गेल्या काही महिन्यांपासून स्थिती खूपच सुधारली आहे.बांधकाम व्यावसायिक नवीन योजनांची घोषणा करीत आहेत.त्याला प्रतिसादही उत्तम मिळत आहे.साताऱ्यात राहण्यासाठी आणि गुंतवणूक म्हणूनही घर घेणारे लोक आहेत,सातारचे वातावरण आणि पर्यावरण चांगले असल्याने मुंबई आणि पुणे आणि राज्याच्या अनेक भागातील लोकही साताऱ्यात घर घेण्यास उत्सुक आहेत.खानदेशातील नंदूरबार येथील एका कुटुंबाने साताऱ्यात स्थायिक होण्यासाठी घर घेतले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.साताऱ्यात आता लोक बंगला सोडून पुन्हा फ्लॅटकडे वळू लागले असल्याने बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फायदा होत आहे.मेगा सिटीची संकल्पना साताऱ्यात अद्याप लोकप्रिय झालेली नाही.पण सर्व सुविधा असलेल्या फ्लॅटसंस्कृतीकडे लोक नव्याने आकर्षित होउ लागले आहेत,हे महत्वाचे आहे.

शासकीय धोरणात आणखी थोडी शिथीलता येण्याची अपेक्षा व्यक्त करुन सयाजी चव्हाण म्हणाले,बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मंदीचे सावट पुर्ण दूर करण्यासाठी सरकारी परवाना पातळीवर अधिक गतीने काम होणे अपेक्षित आहे.बांधकाम व्यावसायिक एखाद्या जागेत पैसे गुंतवतो.त्यानंतर त्याला जलद परवानगी मिळाली नाही तर त्याचा पैसा गुंतून राहतो.त्याला अन्य काहीही करता येत नाही.असे अनेक प्रकल्प जर विलंबात अडकले तर त्याचा या व्यवसायालाच त्रास होतो.म्हणूनच सरकारी यंत्रणा अधिक गतीने हालण्याची गरज आहे.

बांधकाम व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मीती करणारा व्यवसाय असल्याने सरकारने या व्यवसायाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.एका गृह प्रकल्पाशी विविध 40 छोट्या व्यवसायांचा संबंध असतो.त्यातून शेकडो लोकांना रोजगार मिळत असतो.त्यामुळे जेवढे बांधकाम प्रकल्प वाढतील तेवढाच रोजगार वाढणार आहे.हे लक्षात घेउनच सरकारने आता या व्यवसायाला चालना मिळेल असे निर्णय घेणे आवश्‍यक आहे,असेही सयाजी चव्हाण म्हणाले.
सरकारच्या परवडणारी घरे योजनेचेही त्यांनी स्वागत केले.पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेकांचे घरांचे स्वप्न पुर्ण झाले आहे.या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची आहे,असेही त्यांनी सांगितले.
सयाजी चव्हाण 2010 पासून बांधकाम व्यवसायात असून मंगलमूर्ती डेव्हलपर्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 18 प्रकल्प यशस्वीपणे पुर्ण केले आहेत.लवकरच त्यांचे आणखी 3 बांधकाम प्रकल्प सुरु होणार आहेत.
चौकट

मानसिकता बदलायला हवी

बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना सर्वप्रकारच्या सुविधा देण्यास तयार आहेत.पण ग्राहकांनीही आपली मानसिकता थोडी बदलण्याची गरज आहे.इमारतीच्या देखभालीचा खर्च ग्राहकांनी नियमितपणे देणे गरजेचे आहे.पण अनेकवेळा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी लिफ्टवा वापर करीत नाही या कारणाने खर्च देत नाहीत.त्यामुळे अनेक इमारतींमधील लिफ्ट बंद आहेत.ज्या संकुलात आपण राहत आहोत तेथील संपुर्ण लाभ घ्यायचा असेल तर देखभालीचा खर्च देउन ग्राहकांनी सहकार्य करणे आवश्‍यक आहे,असे आवाहनही सयाजी चव्हाण यांनी केले.

महारेराचा फायदाच

बांधकाय व्यवसायावर नियंत्रण ठेवणाऱ्या महारेरा कायद्यामुळे फायदाच झाला आहे.गांभिर्याने व्यवसाय करणारेच आता या क्षेत्रात उरले आहेत.चुकीच्या हेतूने या व्यवसायात शिरलेले बाहेर पडले आहेत अशी माहितीही सयाजी चव्हाण यांनी दिली.या कायद्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत.महारेरामुळे व्यवसायातील चुकीच्या गोष्टींना चाप बसला असेही त्यांनी सांगितले.या कायद्याचा वापर करुन सरकारने चुकीच्या लोकांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.