- दस्त नोंदणीत वाढ : दिवाळीपूर्वीच प्रतिसाद
पिंपरी – करोनामुळे मरगळलेल्या रियल इस्टेट क्षेत्राला अच्छे दिन येत असल्याचे सध्या दिसून येत आहे. यावर्षी करोनामुळे मंदीचे सावट असतानाही गतवर्षीच्या तुलनेत काही ठिकाणी दस्त नोंदणीत अर्थात खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणा वाढ झालेली दिसून येत आहे. दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान दस्त नोंदणी वाढत असते, परंतु यंदा दिवाळीपूर्वीच खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे दस्त नोंदणीच्या आकड्यांवरुन दिसून येत आहे.
सह-दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये सध्या दस्त नोंदणीत चांगलीच वाढ झाली आहे. दिवाळीपूर्वीपासूनच सदनिकांचे करारनामे, बक्षीसपत्र यांच्या नोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी मुद्रांक शुल्कात घट करुनही त्यामुळे सह-दुय्यम निबंधक कार्यालयांना मुद्रांक शुल्कातून समाधानकारक उत्पन्न मिळाल्याचे दिसून येत आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे 20 मार्चपासून शहरातील सह-दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. त्यानंतर 19 मे पासून प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यालये वगळता अन्य कार्यालये पूर्ववत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तर, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यालयांनाही परवानगी मिळाली. पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, आकुर्डी, भोसरी, दापोडी, पिंपरी आदी ठिकाणी एकूण 7 सह-दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये सध्या दस्त नोंदणीसाठी प्रतिसाद वाढला आहे. दिवाळीपूर्वीपासूनच दस्त नोंदणी प्रक्रियेत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक नोंदणी
चिंचवड येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 5 च्या कार्यालयात चालू महिन्यात आत्तापर्यंत 600 ते 700 दस्तांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये सदनिकांचे करारनामे, बक्षीसपत्र दस्तांचे प्रमाण मोठे आहे. त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले आहे. कार्यालयाला ऑक्टोंबर महिन्यामध्ये 828 दस्तांची नोंदणी झाली. त्या माध्यमातून 8 कोटी 26 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी 611 दस्तांचीच नोंदणी झाली होती. त्या माध्यमातून 9 कोटी 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
सदनिकांच्या करारनाम्यांचे प्रमाण अधिक
याचप्रमाणे आकुर्डी येथील हवेली क्रमांक 4 च्या कार्यालयात देखील दस्त नोंदणीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सातत्याने कार्यालये गजबजलेली आहे. सध्या दररोज 30 ते 40 दस्तांची नोंदणी होत आहे. दिवाळीपूर्वी तर दररोज 60 दस्तांची नोंदणी होत होती. या दस्त नोंदणीमध्ये सदनिकांच्या करारनाम्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
गतवर्षी दस्त संख्या कमी होती. तरी, मुद्रांक शुल्कातून मिळणारे उत्पन्न जास्त होते. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात 2 टक्क्याने घट केली. तसेच, बक्षीसपत्रासाठी देखील शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्याचा परिणाम यंदा उत्पन्नावर जाणवला आहे.
– एस.सी.बुरसे,
सह-दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक 5