पिंपरी -एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये वल्लभनगर आगारातील कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यामुळे साडेपाच महिने बससेवा ठप्प होती. संप संपल्यानंतर आता वल्लभनगरची लालपरी सुसाट धावत आहे. त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून संपानंतर अवघ्या पंचवीस दिवसांत आगाराने 1 कोटी 35 लाखांच्या उत्पन्नाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे वल्लभनगरच्या लालपरीला पुन्हा अच्छे दिन आले आहेत.
27 ऑक्टोबर 2021 पासून संपूर्ण राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामध्ये वल्लभनगर आगारातील सुमारे 180 कर्मचारी सहभागी झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार 21 एप्रिलपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हायचे होते. त्यानुसार वल्लभनगर आगारातील सर्व कर्मचारी 21 तारखेपर्यंत कामावर हजर झाले. त्यामुळे साडेपाच महिने ठप्प असलेली वल्लभनगर आगारातील एसटीची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
एसटी महामंडळाने आता उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. त्यानुसार वल्लभनगर आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्येच शनिवारपासून सोमवारपर्यंत सुट्ट्या असल्याने प्रवाशी संख्या वाढली आहे. फुकट्या प्रवाशांचा प्रवास टाळण्यासाठी महामंडळाने पुणे विभागात पाच भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
त्यामुळे फुकट्या प्रवाशांना चाप बसून उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. वल्लभनगर आगाराच्या 50 एसटी बस आहेत. त्या राज्याच्या अनेक भागात जात असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. तर दररोज पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न आगाराला मिळत आहे. सर्वसामान्यांना परवडणारी व राज्याच्या काना-कोपऱ्यात जाणाऱ्या या लालपरीला पुन्हा अच्छे दिन आले आहेत.