पिंपरी, (प्रतिनिधी) – यंदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अच्छे दिन पहावयास मिळत आहे. गत विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवारही देऊ न शकलेल्या पक्षाकडे यंदा मात्र इच्छुकांची रांग लागत आहे. तीन विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ११ जणांनी आतापर्यंत उमेदवारी मागितली असून येत्या दोन दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
२०१९ साली राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष एक होता. तरीदेखील विधानसभा निवडणुकीत भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात पक्षाला उमेदवार उतरविता आला नाही आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ पक्षावर आली होती.
यंदा पक्षात दुफळी पडलेली असतानाही शरद पवारांची राष्ट्रवादी खूपच चांगल्या स्िथतीत दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने पक्षातील मरगळ दूर नवचैतन्य आले आहे.
परिणामी अपेक्षित परिणाम मिळण्याच्या आशेने तीनही मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढतच चालली आहे. सर्वाधिक इच्छुक पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहे.
या मतदारसंघातून २०१९ साली राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे निवडून आले होते. परंतु ते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. यामुळे पिंपरीत अनेकांना विजय निश्चित वाटत आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे शहरातील तीनही विधानसभा मतदार संघातून एकूण 11 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक सात जणांनी उमेदवारी मागितली आहे.
इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली असून, येत्या 10 तारखेपर्यंत इच्छुकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीनही विधानसभा मतदार संघांमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकार्यांकडून अर्ज मागविले आहेत.
यामध्ये पिंपरी विधानसभेकरिता 7, चिंचवड विधानसभेकरिता 2 व भोसरी विधानसभेकरिता 2 असे एकूण 11 इच्छूकांनी अर्ज सादर केले आहेत.
यामध्ये चिंचवड व भोसरी या खुल्या प्रवर्गातील विधासभेकरिता 10 हजार रूपये तर पिंपरी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने यामधील इच्छुकांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे. तर इच्छुक महिलांकडूनही 5 हजार रुपये शुल्क आकरण्यात आले आहे.
पदाधिकार्यांची मीटिंग
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा देखील सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 90 ते 100 जागांवर तयारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची नुकतीच आॅनलाइन मीटिंग झाली.
या मीटिंगमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकार्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार गटाची प्राथमिक स्तरावर तयारी असावी, म्हणून जवळपास 100 जागांवर तयारी सुरु आहे.
गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा . बूथ कमिटी तयार करा, अशा सूचना पदाधिकार्यांना देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याचे समजते.