गोंदिया – जंगली डुकरांची शिकार करण्यासाठी लावून ठेवलेल्या विजेच्या तारेत अडकून तीन वर्षाच्या वाघाचा मृत्यू झाला. ही घटना गोंदिया वनपरिक्षेत्रातील चुटिया आणि लोधीटोला गावाच्या शेतशिवारात घडली आहे.
ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने धारदार शस्त्राने वाघाचे बारिक तुकडे केले व ते शेतात फेकून दिले. शेतात काम करण्यासाठी आलेल्या काही जणांना दुर्गंधी येताच ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने काही तुकडे एकत्र केले आहेत, मात्र वाघाचे पंजे आणि डोके सापडलेले नाही.
गोंदियातील चुटिया व लोधीटोला गावालगत नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. या ठिकाणी विजेचा शाॅक देऊन डुक्कर आणि चितळांची शिकार करण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. यावेळी देखील जंगली डुक्कराची शिकार करण्याकरिता वीजेच्या तारेचे जाळे पसरवण्यात आले असावे मात्र त्या जाळ्यात सापडून वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वन विभागाचे अधिकारी अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील एका वाघिणीची शिकार करण्यात आली होती. ताडोबाच्या खातोडा गेट परिसरात ही घटना उघडकीस आली होती. येथे सामान्य नागरिकांना जाण्याची परवाणगी नाही. तरी देखील येथे तारांचा फास लावून वाघिणीची शिकार करण्यात आल्याचे उघड झाले होते.