बीट मार्शल कधी सुरू होणार?
शहरात सध्या बीट मार्शलची अवस्था नाजूक आहे. शहराचा वाढता पसारा आणि गुन्हेगारीत होत असलेली वाढ लक्षात घेता पीसीआर व बीट मार्शल सक्रिय असणे आवश्यक आहे. मात्र, बीट मार्शल गेले कित्येक दिवस बंद असल्याने चोट्यांचे फावत आहे. आता तरी बीट मार्शल सुरू करण्याची मागणी महिला करत आहेत.
सातारा – सातारा शहर व परिसरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून गेल्या दोन महिन्यांपासून हे चोर महिलांचे दागिने लुटत आहेत. मात्र, यातील एकाही घटनेचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नसल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मंगळवारी (दि. 12) सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या तर बुधवारी (दि. 13) रात्री पावणेबाराच्या सुमारास मंगळवार पेठेत एक महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले होते. साताऱ्याजवळच्या ग्रामीण भागातही गेल्या दोन-तीन महिन्यांत सोनसाखळ्या चोरीस गेल्या आहेत. मोटारसायकलवरून येणारे चोरटे रस्त्याने चालत निघालेल्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी करंजे पेठ व मंगळवार पेठेतील दोन दुकानदारांच्या गळ्यातील सोनसाखळ्या बोलता बोलता लंपास झाल्या होत्या.
स्वाती नीलेश ताटे (वय 38, रा. शिवम कॉलनी, शुक्रवार पेठ, सातारा, मूळ रा. तारळे, ता. पाटण) या दि. 12 रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास विठोबाच्या नळाकडून घराकडे जात असताना मंगळवार तळे रस्त्यावर सुमित्राराजे पतसंस्थेसमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळ्यातील 15 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले होते.
यापूर्वीही बसस्थानक परिसरातून प्रशासकीय इमारतीकडे चालत निघालेल्या महिलांच्या बॅगा हिसकावल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपासही अद्याप लागलेला नाही. सातारा शहरात गेल्या सहा महिन्यांत सोनसाखळी व बॅगा चोरण्याचे दहाहून अधिक गुन्हे घडले आहेत. मात्र, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
इराणमधून येऊन महाराष्ट्रातील अहमदनगर व पुणे येथे स्थायिक झालेल्यांकडून या आधी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. आता त्यांच्याकडून होणाऱ्या चोऱ्या थांबल्या आहेत तरी अशी एखादी घटना घडली की इराणी संशयितांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना होतात. इराणी संशयितांच्या नावाखाली आता स्थानिक चोरट्यांनी हा धंदा चालवल्याची चर्चा आहे.