सुनिल गावसकर : तंत्रशुद्ध फलंदाजीची पन्नाशी

सर्वप्रथम दहा हजार धावा आणि 34 शतकांचा बादशहा

– अमित डोंगरे
सुनील मनोहर गावसकर या नावाची जादू आज त्यांच्या निवृत्तीनंतर जवळपास 35 वर्षांनीही कायम आहे. भारतीय क्रिकेटला जागतीक स्तरावर आदर मिळवून देण्यात ज्या खेळाडूंचा वाटा होता, त्यात गावसकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ज्या काळी भारतीय क्रिकेट संघ परदेशात मालिका खेळायला गेला आहे का पर्यटनाला हेच कळत नव्हते त्या काळात तंत्रशुद्ध फलंदाजीचा बादशहा आपल्याला गवसला. त्यांनीच भारतीयांना वेगवान गोलंदाजी कशी खेळायची हे शिकवले. तासंतास खेळपट्टीवर कसे उभे राहायचे याचे धडे दिले. आपला ऑफ स्टम्प कुठे आहे जगात अनेक फलंदाजांना माहिती नसते मात्र, या विक्रमादीत्याला ते नेमके ठावूक असायचे व त्यामुळेच त्यांनी वैयक्तीक कामगिरीसह सांघिक कामगिरीचे एव्हरेस्ट रचले.

कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम त्यांनी मागे टाकला तेव्हा करोडो भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. 34 कसोटी शतके व 45 अर्धशतके यांच्यासह गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये जगात सर्वप्रथम सर्वाधिक धावांचा मनोरा रचला. देशाकडून सर्वात जास्त 125 कसोटी सामने खेळताना त्यांनी 10 हजार 122 धावा केल्या. याच धावा व ही कामगिरी पुढे कित्येक वर्षे नवोदितांना अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही खुणावत होती. त्यानेच नंतर हा विक्रम मोडला हे जरी खरे असले तरी त्यावेळी ही कामगिरी कोणी मागे टाकेल असा विचारही होत नव्हता.

6 मार्च 1971 या दिवशी भारतीय क्रिकेटच्या या रॉक ऑफ जिब्राल्टरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्या पहिल्याच वेस्ट इंडिज दौऱ्यात धावांचा रतिब घातला. भारतीयसंघ जेव्हा विंडिजच्या विमानतळावर उतरला तेव्हा तेथिल वेस्ट इंडियन कस्टम अधिकाऱ्याने गावसकरला त्याची उंची पाहून टोमणे मारले होते. मात्र, हा दौरा आटोपून जेव्हा भारतीय संघ मायदेशी परतत असताना तोच अधिकारी गावसकर यांच्यासमोर नतमस्त झाला. या मालिकेत गावसकर यांना आम्ही कधीच स्वस्तात बाद करु शकलो नाही अशा आशयाचे एक गाणेही एका कॅरेबियन गायकाने तयार केले.

वेस्ट इंडीजच्या वादळी आणि झंझावाती गोलंदाजीसमोर साधे हेल्मेटही न घालता निधड्या छातीने वेगवान गोलंदाजीच्या तोफखान्याला सामोरा जाणारा हा फलंदाज म्हणजे आजच्या कसोटी क्रिकेटवीरांसमोर एक दंतकथाच बनून राहिला आहे. शिवाय क्रिकेट या खेळाचे भारतातले व्यावसायिकीकरण करण्यात, क्रिकेटला “कॉर्पोरेट लूक’ देण्यात गावसकर यांचे योगदान मोठे मानले जाते.

एकदिवसीय क्रिकेट सुरु झाले पण ते गावसकरांना सुरूवातीला पचलेच नाही व त्यांनी एका 60 षटकांच्या या सामन्यात अखेरपर्यंत नाबाद राहताना केवळ 36 धावा केल्या. त्यावेळी त्यांच्या संथ फलंदाजीवर प्रचंड टीकाही झाली होती. मात्र, आपल्याला क्रिकेटचा हा प्रकार नवीन होता व त्यामुळे समोरचे फलंदाज बाद होचत असताना खेळपट्टीवर टीकून राहणेच महत्वाचे वाटले असे उत्तर त्यांनी दिले होते. अर्थात क्रिज्ञकेटच्या याच प्रकारात गावसकर यांचे पहिले व एकमेव शतक साकार होण्यासाठी 1987 साल उजाडावे लागले. कानपूरच्या न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्स्र्धेतील सामन्यात त्यांनी 103 धावाची खेळी केली व एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक साकार केले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर 1987 सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्तीही जाहीर केली.

यशाच्या शिखरावर असतानाच निवृत्ती घेणे अनेकांना जड जाते पण या माणसाने त्यातही अनेकांना आपली कारकिर्द कुठे थांबवली पाहिजे याचा धडा दिला. 108 एकदिवसीय सामने खेळून 1 शतक व 27 अर्धशतके फटकावत त्यांनी 3 हजार 92 धावा केल्या. क्रिकेटचा हा प्रकार त्यांना मानवला नाही हे मात्र, खरे. प्रथम दर्जाच्या सामन्यात 25 हजारांपेक्षाही जास्त धावा तसेच 81 शतके व 105 अर्धशतके ही त्यांची कामगिरीच त्यांच्या तंत्रशुद्धतेची ओळख पटवून देते. क्रिकेटमधून निवृत्त झाले असले तरी ते क्रिकेटपासून निवृत्त कधीच झाले नाहीत.

समालोचक म्हणून ते कार्यरत झाले तसेच सल्लागार म्हणूनही त्यांनी आपला अनुभव नवोदितांना सांगितला. सचिनला आज क्रिकेटचा देव म्हणतात पण याच सचिनसाठी गावसकर हे श्रद्धास्थान होते. सचिनने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जागतिक क्रिकेटच्या पाऊल वाटेचा एकप्रेस वे केला पण आज निविृत्तीच्या जवळपास 35 वर्षांनंतरही भारतीय क्रिकेटबद्दल बोलताना सचिनच्या आधी सुनील गावसकर यांचेच नाव घेतले जाते यातच सर्वकाही आले. याच विक्रमादीच्याच्या कारकिर्दीला 6 मार्च रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा.

– अमित डोंगरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.