सुवर्णकन्या : हिमा दास

आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणे भारतासाठी मोठी आश्‍चर्याची बाब आहे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले खेळाडू यशस्वी होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे मग ती ऑलिम्पिक असो की जागतिक स्पर्धा या महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताला अवघी बोटावर मोजता येतील इतकी पदके मिळतात आणि तिही बॅडमिंटन मुष्टियुद्ध कुस्ती आणि नेमबाजीमध्ये. इतर खेळात आपण खूपच मागे आहोत विशेषतः ऍथलॅटिक्‍समध्ये तर आपले खेळाडू मुख्य स्पर्धेलाही पात्र ठरत नाही ऍथलॅटिक्‍स त्यातही धावण्याच्या स्पर्धेत मिल्खा सिंग पी टी उषा यांच्याशिवाय इतर कोणाचेही नाव आपल्याला आठवत नाही. मिल्खा सिंग यांनी ऑलिम्पिकमध्ये चौथा क्रमांक मिळवला होता तर पी टी उषा यांचे ऑलिम्पिक पदक काही शतांश सेकंदाने हुकले होते. याच रम्य आठवणी आपल्याकडे आहेत त्यामुळे जागतिक स्पर्धेत पदक मिळवतील असे खेळाडू आपल्याकडे आहेत की नाही असा प्रश्‍न सर्वांना पडला होता आणि या प्रश्‍नाचे उत्तर हो असे आहे आणि या खेळाडूने जागतिक स्पर्धेत भारताला पदकच नव्हे तर सुवर्ण पदक मिळवून दिले ते हि एक दोन नव्हे तर पाच …हो पाच सुवर्ण …आश्‍चर्य वाटते ना? हि आश्‍चर्यकारक कामगिरी करून देशाची मान अभिमानाने उंचावणारी खेळाडू आहे हिमा दास.

हिमा दास या युवा खेळाडूने चेक प्रजासत्ताक मधील नोवे मेस्टो नाड मेटुजी येथे सुरु असलेल्या जागतिक ग्रां पी स्पर्धेत अवघ्या वीस दिवसात 5 सुवर्ण पदके मिळवली आहे. भारताच्या कोणत्याही धावपटूने एकाच स्पर्धेत इतकी सुवर्णपदके मिळवली नाहीत म्हणूनच हिमा दास हिची कामगिरी ऐतिहासिक आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गज धावपटूंना मागे टाकत तिने हि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल व अशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदके मिळवली आहेत पण ज्या स्पर्धेत जगातील सर्व नामांकित खेळाडू सहभागी होतात अशा जागतिक पातळीवरील स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास रचणारी हिमा हि पहिलीच भारतीय खेळाडू आहे म्हणूनच तिची हि कामगिरी ऐतिहासिक अशीच आहे.

आसाममधील नागाव जिल्ह्यातील धिंग या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात हिमाचा जन्म झाला. तिचे वडील रोंजित हे अल्पभूधारक शेतकरी आहेत शेतीवरच त्यांची उपजीविका चालते. घरात सहा भावंडं हिमा सर्वात धाकटी तिची आई घरकाम करते. घरी अठरा विश्‍व दारिद्रय असणाऱ्या हिमाला लहानपणी फुटबॉल खेळायला खुप आवडायचे. शाळेतील मुलांसोबत ती फुटबॉल खेळायची. तिच्या पायात असा वेग कि क्षणात फुटबॉल गोलपोस्टमध्ये जायचा अतिशय चपळ व काटक असणाऱ्या हिमाचा धावण्याचा वेग पाहून तिच्या शिक्षकांनी तिला निपॉन दास या एथलॅटिक्‍स प्रशिक्षकाकडे नेले. निपॉन दास यांनी तिला गुवाहटीच्या ऍथलॅटिक्‍स अकादमीत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. घरापासून दीडशे किलोमीटर अंतरावरील गुवाहाटीमध्ये जाऊन तिने ऍथलॅटिक्‍सचे खडतर प्रशिक्षण घेतले.

दररोज पहाटे उठून ती धावण्याचा कसून सराव करीत असे तिचे प्रशिक्षक निपॉन दास तिच्याविषयी सांगतात की, या मुलीत गुणवत्ता तर आहेच पण तिला कुणी प्रेरणा देण्याची गरज नाही. जेंव्हा पांढऱ्या रेषेवर पोहचते. तेंव्हा तिच्या डोक्‍यात एकच असतं सगळ्यात पुढं जायचं पळायचं वेगानं पळायचं .

निपॉन दास यांच्याकडे दीड वर्षाचं खडतर प्रशिक्षण घेतल्यावर तिने 100, 200 आणि 400 मीटर स्पर्धेत अनेक पदके जिंकली. जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. कठोर मेहनत आणि जिंकण्याची उर्मी असेल तर जगात काहीही अशक्‍य नाही हेच हिमाने दाखवून दिले आहे. एकेकाळी पैसे नसल्याने पायात बूट घालायला न मिळणारी हिमा आज आदिदास सारख्या बूट बनवणाऱ्या कंपनीची ब्रॅंड अँबासिडर बनते. तिची कामगिरी अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तीच्या कामगिरीने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. गळ्यात आसामी गमछा आणि आणि पाठीवर तिरंगा घेऊन पळणारी धिंग एक्‍सप्रेस म्हणजेच हिमा दास हि आसामचीच नव्हे तर देशाची शान आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या हिमाकडून ऑलिंपिक पदकांची अपेक्षा करता येऊ शकते. हिमा दास हिचे मनापासून अभिनंदन…!!

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.